दिवे अंजूरच्या सरपंचांच्या खुर्चीला कपिल पाटील यांचे वंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:43 AM2021-08-22T04:43:02+5:302021-08-22T04:43:02+5:30
भिवंडी : केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाच दिवस सुरू असलेल्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप शुक्रवारी भिवंडी तालुक्यातील दिवे ...
भिवंडी : केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाच दिवस सुरू असलेल्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप शुक्रवारी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर या त्यांच्या मूळगावी झाला. त्यांचे गावात जाेरदार स्वागत झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन त्यांनी कुटुंबीयांसह थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तेथील सरपंचांच्या खुर्चीला वंदन केले. यावेळी पाटील भावूक झाले होते.
१९८८ मध्ये पाटील यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा दिवे अंजूरच्या सरपंचपदापासून सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत विविध पदे भूषवून थेट केंद्रीय राज्यमंत्रिपदाला गवसणी घातली. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री बनण्याचे स्वप्न मी कधी पाहिले नव्हते. ग्रामस्थांनी १९८८ मध्ये दाखवलेला विश्वास प्रत्येक वेळी सार्थ ठरविल्याने कुटुंबीयांच्या सहकार्याने व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रत्येक ठिकाणी केलेल्या कामाची पोचपावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. सरपंचपदावर असताना ज्या खुर्चीवर मी बसलाे, त्या खुर्चीला वंदन करण्यासाठी मी आलाे असल्याचे त्यांनी सांगितले. पाच दिवसांनंतर जनआशीर्वाद यात्रेचा समारोप करून तब्बल दीड महिन्यांनंतर घरी परतलेल्या पाटील यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.