13 वर्षीय मुलीने जिंकलं केंद्रीय पंचायत राज्यमंत्र्यांचे मन; ब्लाइंड फोल्ड कलेने कपिल पाटील थक्क
By नितीन पंडित | Published: September 7, 2022 02:38 PM2022-09-07T14:38:17+5:302022-09-07T14:47:42+5:30
आपल्या आजीला भेटण्यासाठी आलेली १३ वर्षीय मुलगी आपल्या मामासोबत केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या हायवे दिवे येथील घरी गणपती दर्शनाला गेली
भिवंडी - मुंबईहून भिवंडीतील पद्मा नगर येथे आपल्या आजीला भेटण्यासाठी आलेली १३ वर्षीय मुलगी आपल्या मामासोबत केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या हायवे दिवे येथील घरी गणपती दर्शनाला गेली असता मुलीमध्ये असलेल्या ब्लाइंड फोल्ड या कलेने खुद्द केंद्रीय मंत्री पाटील चकित झाले असून भविष्यात काही मदत लागली तर सांग मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात मुलीचे कौतुक पाटील यांनी केले आहे.
बानी देवसानी असे या तेरा वर्षीय मुलीचे नाव आहे. बानी आपल्या आई-वडिलांसोबत मुंबईतील गोरेगाव परिसरात असून गोरेगाव येथील सेंट थॉमस हायस्कुल व ज्युनियर कॉलेज येथे इयत्ता आठवीत शिकत आहे. गणेशोत्सव निमित्त शाळेला सुट्टी असल्याने ती भिवंडीतील पद्मा नगर येथे आपल्या आजीकडे पाहुणे आली होती. त्यावेळी तिचे मामा तीला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घरी गणपती दर्शनासाठी घेऊन गेले होते. येथे मामाने आपल्या भाचीकडे असलेल्या अद्भुत कलेबद्दल मंत्री पाटील यांना सांगितले असता बानी हिने तिची कला पाटील यांच्यासमोर सादर केली. डोळ्याला पट्टी बांधून बानीकडे जो कागद किंवा कार्ड मंत्री पाटील तिच्याकडे देत तो कागद, कार्ड व त्यावरील अक्षरे, आकडे व रंग हे बानी अचूक सांगत असल्याने मंत्री पाटीलही चकित झाले.
अभ्यासात हुशार असलेल्या बानीला तिच्या वडिलांनी सहा वर्षांची असतांना ब्लाइंड फोल्ड या कोर्ससाठी पाठविले होते. मात्र हा कोर्स अर्धवट असतांनाच तिचे शिक्षक मुंबई सोडून गेले होते. त्यानंतर अधून मधून ती घरी त्या कोर्सची उजळणी करत असे. मागील दोन वर्षांपूर्वी लागलेल्या लॉकडाऊनमुळे तिने घरी स्वतःच कोर्समध्ये शिकविल्या गोष्टी आत्मसात केल्या व ती या कलेत आता निपुण झाली आहे. मंत्री पाटील यांच्यासमोर तिने दाखवलेल्या या अद्भुत कलेने खुद्द पाटील यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयदेखील हैराण झाले होते. बानी हिच्या कलेची नोंद लिम्का बुक ऑफ रिकॉर्डमध्ये करण्यासाठी बानीला निमंत्रण आले असून त्यासाठी सध्या ती प्रयत्न करत असल्याची माहिती तिच्या मामांनी दिली आहे.