भाजपला लक्ष्य करण्याकरिता कपिल पाटील काँग्रेसच्या निशाण्यावर’; भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरिता ओबीसी उमेदवाराचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 10:00 AM2023-05-26T10:00:03+5:302023-05-26T10:00:12+5:30
ठाणे जिल्ह्यात भाजपला आव्हान द्यायचे तर भिवंडीचा काँग्रेसला गड मजबूत करून कपिल पाटील यांच्या राजकीय साम्राज्याला आव्हान द्यायचे, हाच काँग्रेसचा इरादा आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भिवंडी लाेकसभा मतदारसंघातून केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना आव्हान देण्याकरिता काँग्रेसकडून ओबीसी प्रवर्गातील तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यस्तरीय व जिल्हा पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपला धूळ चारायची तर भिवंडी लोकसभा मतदारसंघावर कब्जा करायचा, असे काँग्रेसला वाटत आहे. भिवंडीतील न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात खटला दाखल करून त्यांना बेजार केले गेले. त्याचा वचपा काढणे हाही हेतू असल्याचे संकेत नेत्यांनी दिले.
ठाणे जिल्ह्यात भाजपला आव्हान द्यायचे तर भिवंडीचा काँग्रेसला गड मजबूत करून कपिल पाटील यांच्या राजकीय साम्राज्याला आव्हान द्यायचे, हाच काँग्रेसचा इरादा आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भिवंडी लाेकसभेच्या निवडणुकीकरिता सहा तगड्या उमेदवारांचा पर्याय पक्षाच्या उमेदवार निवड समितीसमोर ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी जारी केलेल्या सहा निकषांमध्ये बसणाऱ्या ओबीसी नेत्यांचा शाेध घेतला जात आहे. माजी खासदार, आमदार अथवा चांगला संघटनात्मक अनुभव असलेली आणि काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जोडलेली व्यक्ती उमेदवार म्हणून देण्याचा पक्षाचा विचार आहे.
नवी दिल्ली येथील काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष अजय सिंह यादव यांनी राज्याच्या भानुदास माळी यांना या सहा निकषांवर उमेदवारांचा शाेध घेऊन शिफारस करण्याचे आदेश दिले आहेत.
भिवंडी लाेकसभेतून माजी खासदार सुरेश टावरे, काँग्रेसचे ओबीसी नेते डाॅ. प्रकाश भांगरथ, माजी आमदार ताहीर माेमीन, राकेश पाटील आणि दयानंद चाैधरी आदी नेत्यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भांगरथ यांनी या वृत्तास दुजाेरा दिला.