भिवंडीत फडकले बंडाचे झेंडे; कपिल पाटील विरुद्ध सुरेश टावरे लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 01:03 AM2019-03-24T01:03:51+5:302019-03-24T01:04:53+5:30
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुरेश टावरे यांचे नाव जाहीर होताच कुणबीसेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी टावरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत बंडाचे निशाण फडकवण्याचा इशारा दिला आहे.
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुरेश टावरे यांचे नाव जाहीर होताच कुणबीसेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी टावरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत बंडाचे निशाण फडकवण्याचा इशारा दिला आहे. येत्या १ एप्रिलला आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे शनिवारी पाटील यांनी जाहीर केले.
भाजपाने कपिल पाटील यांना यापूर्वीच उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याकरिता खटपट करणारे सुरेश (बाळा) म्हात्रे यांना काँग्रेसने डावलल्याने तेही अपक्ष निवडणूक लढवून बंडाच्या पवित्र्यात उभे राहण्याची शक्यता आहे. म्हात्रे उद्या (रविवारी) आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे भिवंडीत दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना दोन बंडखोर घेरण्याची दाट शक्यता आहे.
मागील आठवड्यात भाजपाने कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये वेगाने हालचाली सुरू झाल्या. पाटील यांना शिवसेनेचे म्हात्रे यांनी यापूर्वीच खुले आव्हान दिले होते. भाजपाने पाटील यांच्याव्यतिरिक्त कुणासही तिकीट दिल्यास त्यांचे काम करणार, मात्र पाटील यांचे करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांचे काही दिवसांपासून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी काही नगरसेवकांच्या शिफारशीही गोळा केल्या होत्या. मात्र, काँग्रेसश्रेष्ठींनी शनिवारी टावरे यांचे नाव जाहीर केले.
टावरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये निवडून आले होते. भाजपाच्या मातब्बर उमेदवाराशी लढत देणाऱ्या उमेदवाराच्या शोधात असलेल्या काही स्थानिक काँग्रेसच्या एका गटाने म्हात्रे यांना उमेदवारीच्या शर्यतीत आणले. परंतु, काँॅग्रेसच्या निवड समितीने टावरे यांची उमेदवारी जाहीर केली. २०१४ च्या निवडणुकीत विश्वनाथ पाटील काँग्रेसकडून उभे होते. मात्र, भाजपाच्या कपिल पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता.
१ एप्रिलला भूमिका
जाहीर करणार
पडघा : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने तिकीट नाकारल्याने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील हे आक्र मक झाले आहेत. पडघ्यात शनिवारी सभा घेऊन बंडाचे निशाण फडकवले आहे. दि. १ एप्रिलला सभा घेऊन आपला निर्णय जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीत खर्च करण्याकरिता पैसे नाहीत, असे कारण देऊन प्रदेश कार्यकारिणीने आपले तिकीट कापले असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला.
पाटील यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. यात त्यांना तीन लाख १० हजार मते पडली होती. मात्र, यावेळेस पाटील हे लोकसभेकरिता इच्छुक नसल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये काँग्रेसकडूनच पेरण्यात आल्या व ऐन वेळेस आपले तिकीट कापण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत बोलावले होते. मात्र, आपण आपली व्यथा पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत, असेही ते म्हणाले. पाटील कुठली भूमिका घेतात, यावर काँगे्रसच्या टावरे यांचे भवितव्य अवलंबून आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, काँगे्रसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विश्वनाथ पाटील हे काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये असून ते काँग्रेसविरोधात काम करणार नाहीत, असा आपल्याला विश्वास वाटतो. ते नाराज असल्यास आपण त्यांची समजूत काढू, असेही ते म्हणाले.
पक्षाने माझ्यावर
दाखवला विश्वास
सुरेश टावरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून नेहमी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम निष्ठेने केले म्हणून माझ्यावर पक्षाने विश्वास दाखवला. यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व पक्षाचे प्रभारी पी. संदीप यांनी सहकार्य केले.
आज निर्णय जाहीर करणार
भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकणारे सुरेश म्हात्रे यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली असून भिवंडीतून अपक्ष निवडणूक लढवण्याबाबत उद्या निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले.