कपिल पाटील यांना डावलल्याने मानापमान नाट्य; छायाचित्रावरून केंदीय मंत्र्यांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:17 AM2024-04-11T11:17:30+5:302024-04-11T11:18:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी ठाणे विभागीय अध्यक्ष व केंद्रीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी ठाणे विभागीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे छायाचित्र लावण्यात न आल्याने मानापमान नाट्य सुरू झाले. याबाबत पाटील यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. कार्यक्रमात बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांची छायाचित्रे लावण्यात आली होती.
ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील रेमंड मैदानाशेजारी असलेल्या जागेत भाजपच्या प्रशस्त ठाणे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
बॅनरवर पाटील यांचे छायाचित्र नसल्याबद्दल शहराध्यक्ष संजय वाघुले आणि माजी शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांच्याकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कपिल पाटील ठाणे विभागीय अध्यक्ष होते, तसेच ते विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री असल्याने त्यांचे छायाचित्र लावण्याच्या सूचना केल्या होत्या. असे असतानाही, हा बॅनर बदलण्यात आला नसल्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाणे विभागीय कार्यालयातून जनतेच्या हिताचे कामे होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र, या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी दुसऱ्या मजल्यावरील तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाच्या पाठीमागील बॅनरवर कपिल पाटील यांचे छायाचित्र लावले नसल्याची चर्चा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली होती.