कपिल पाटील यांचे उपटले कान?
By admin | Published: May 30, 2017 05:59 AM2017-05-30T05:59:01+5:302017-05-30T05:59:01+5:30
जनमताचा कौल काहीही असला, तरी सत्ता आणि पैशांच्या बळावर आपल्या पुतण्याला महापौर करण्याकरिता इरेला पेटलेले
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी/ठाणे : जनमताचा कौल काहीही असला, तरी सत्ता आणि पैशांच्या बळावर आपल्या पुतण्याला महापौर करण्याकरिता इरेला पेटलेले खासदार कपिल पाटील यांचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी कान उपटल्याची चर्चा आहे. संपूर्ण बहुमत प्राप्त केलेला काँग्रेस पक्ष फोडून सत्ता स्थापन केली, तर भाजपावर सत्तालोलुपतेची टीका होईल. त्यापेक्षा सत्तेचे पाठबळ असतानाही मतदारांनी चपराक का दिली, त्याचे आत्मचिंतन करण्याचा सल्ला भाजपाच्या नेत्यांनी पाटील यांना दिल्याचे समजते.
भिवंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन ते तीनवेळा पायधूळ झाडायला लावून पाटील यांनी आपल्याबरोबरच त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, प्रत्यक्षात भाजपाची स्वबळावर सत्ता दूरच राहिली. आता कोणार्क विकास आघाडीच्या कुबड्या घेऊन सत्तेचे गणित जुळवण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुुरू असून त्यामुळे भिवंडी भाजपात जुने निष्ठावंत भाजपावाले विरुद्ध कपिल पाटील यांच्या कंपूतील नवभाजपावाले यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मुस्लिमांनी मते दिली. मात्र भिवंडी, मालेगाव येथील कौल पाहता मुस्लिम समाजाचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपा व संघ परिवारातील नेत्यांची आगखाऊ वक्तव्ये आणि उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम उमेदवाराला रिंगणात न उतरवता विजय संपादन केल्याची भाजपा नेत्यांची मिरवलेली शेखी यांचे परिणाम या निवडणुकीत दिसल्याचे बोलले जाते.
भिवंडीतील मतदारांनी एमआयएमसारख्या जहाल जातीयवादी पक्षाला अव्हेरून सर्वसमावेशक विचारांच्या सेक्युलर काँग्रेसचा पर्याय निवडला. शहरात निवडणूक काळात मुस्लिम समाजातील खान, मोमीन असा कोकणी-उत्तर भारतीय मुस्लिमांमधील वाद उकरून काढला जातो. मात्र, यावेळी उत्तर भारतीय व स्थानिक मुस्लिमांनी एकत्र राहून कौल दिला.
रमजानमुळे नगरसेवकांना हलवणे अशक्य
भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेस फोडण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे निवडणुकीतील निरीक्षक माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली.
आपण सर्व पक्षासोबत असून कुठल्याही परिस्थितीत आमिषांना बळी पडणार नाही, अशी ग्वाही नगरसेवकांनी बैठकीत दिली. निवडणूक निकालाची अधिसूचना जारी झाल्यावर काँग्रेस आपल्या ४७ नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करील. त्यानंतर, फाटाफूट करणे कुणालाही शक्य होणार नाही.
जेव्हा पक्षाचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा काँग्रेसही त्यांना दूर नेऊन ठेवू शकते. मात्र, सध्या शहरात रमजानच्या पवित्र महिन्याचे वातावरण असून रोजे सुरू आहेत. काँग्रेसचे ४३ मुस्लिम नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांना घेऊन कुठे बाहेर जाणे अशक्य आहे.
माजी खासदार तथा ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश टावरे यांनी सांगितले की, जनमताचा भक्कम कौल पाहिल्यावर तरी भाजपाने स्वप्न पाहणे सोडले पाहिजे. भाजपाने लोकांनी दिलेला कौल स्वीकारला पाहिजे. काँग्रेसचाच महापौर महापालिकेवर बसणार आहे.
भिवंडीतील सपा शहराध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या असफलतेची नैतिक जबाबदारी स्वीकारत समाजवादी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राजीनामा दिला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सपाने ३५ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ दोन उमेदवार निवडून आले. या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुस्सलाम नोमानी यांनी आपल्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आसीम आझमी यांच्याकडे पाठवले आहेत, अशी माहिती पक्षाचे मीडिया प्रभारी सुभाषचंद्र यादव यांनी दिली.
सत्ता मिळाली नाही तरी खचू नका - रवींद्र चव्हाण
महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळाली नसली, तरी खचून जाऊ नका. शहराच्या विकासाकरिता विरोधक म्हणून आग्रही भूमिका घेत राहा, असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. भाजपा नगरसेवकांची संख्या आठवरून २० पर्यंत वाढवल्याबद्दल खा. कपिल पाटील यांचे चव्हाण यांनी कौतुक केले.
कणेरी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी खा. कपिल पाटील, आ. महेश चौघुले, सतीश धोंड, शहराध्यक्ष संतोष चव्हाण, श्याम अग्रवाल, ममता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. पाटील यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे वाढलेले संख्याबळ हे फळ आहे. यशाने हुरळून न जाता मतदारांच्या भावनांचा, आशाआकांक्षांचा सन्मान ठेवा, असे चव्हाण म्हणाले. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून सभागृहात कसे काम करायचे, याचे धडे नवनिर्वाचित नगरसेवकांना लवकरच दिले जातील, असेही ते म्हणाले.