कल्याण लोकसभा लढविण्याची कपिल पाटील यांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:48 AM2018-05-15T03:48:15+5:302018-05-15T03:48:15+5:30

पक्षाने आदेश दिल्यास मी भिवंडीऐवजी कल्याणची लोकसभा निवडणूक लढवेन, अशी माहिती भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी दिली.

Kapil Patil's preparations for fighting the Kalyan Lok Sabha | कल्याण लोकसभा लढविण्याची कपिल पाटील यांची तयारी

कल्याण लोकसभा लढविण्याची कपिल पाटील यांची तयारी

Next

डोंबिवली : पक्षाने आदेश दिल्यास मी भिवंडीऐवजी कल्याणची लोकसभा निवडणूक लढवेन, अशी माहिती भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी दिली. गेले काही महिने पाटील हे लोकसभेऐवजी विधानसभा लढविण्यास उत्सुक असल्याची ाणि त्यासाठी त्यांनी भिवंडीतील शिवसेनेच्या मतदारसंघाची निवड करून तेथे काम सुरू केल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी अचानकपणे कल्याणबाबत उत्सुकता दाखवल्याने पक्षांतर्गत चर्चेला वेग आला आहे.
कल्याणप्रमाणेच भिवंडीतील राजकीय समीकरणे काय असतील, याबाबतही वेगवेगळे अंदाज लढवण्यास लगेचच सुरूवात झाली. येत्या काळात भाजपाचे नेमके समीकरण काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कल्याण- डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. त्यावेळी आमदार नरेंद्र पवार, भाजपा नगरसेवक उपस्थित होते. भाजपा व शिवसेना युतीतील वाढलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर खासदार पाटील बोलत होते.
माझ्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. पक्षाची भिवंडीत स्थिती चांगली आहे. मात्र, पक्षाने कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्यास आपण रिंगणात उतरू, असे पाटील यांनी स्पष्ट केले. या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात भाजपाकडे भक्कम उमेदवार नसल्याचे सांगितले जात होते. त्याला यामुळे उत्तर मिळाले आहे.
>अडीच वर्षांचा कालावधी बाकी
महापौरपदासाठी भाजपा इच्छुक असतानाही शिवसेनेला हे पद सोडावे लागले. त्यामुळे भाजपाला उपमहापौरपदावर समाधान मानावे लागले. याबाबत, पाटील म्हणाले, केडीएमसीचा कार्यकाळ संपताना शेवटच्या वर्षी काहीही होऊ शकते. शिवसेना-भाजपाच्या भूमिकेला कौटुंबिक नात्याची उपमा दिली. कधीकधी मोठ्या भावासाठी छोट्या भावाला त्याग करावा लागतो. मात्र, हा त्याग वाया गेला, असे होत नसल्याचे सांगत अद्याप महापालिकेचा अडीच वर्षांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेत कोणत्याही घडामोडी घडू शकतात, याचे अप्रत्यक्ष संकेत खासदार पाटील यांनी दिले.

Web Title: Kapil Patil's preparations for fighting the Kalyan Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.