माथेरानच्या मिनी ट्रेनमधून करा धम्माल; वीकेण्डसाठी एक फेरी वाढविली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 09:06 AM2023-05-24T09:06:16+5:302023-05-24T09:06:32+5:30
शनिवारी आणि रविवारी माथेरान स्टेशन ते अमन लॉज सकाळी ८.२०,९.१०,१०.०५ व ११.३५ अशा फेऱ्या असतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : अगोदरच कमी असलेल्या मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमुळे पर्यटकांत नाराजी होती. त्यात काही दिवसांपासून पर्यटकांत वाढ होत अनेकांना तिकीटच मिळत नव्हते. त्यामुळे संताप व्यक्त होत होता. अखेर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत शनिवारी व रविवारी ट्रेनची एक फेरी वाढवली आहे. इतर दिवशी नियमित आठ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे सुटीत माथेरानच्या मिनी ट्रेनमधून धम्माल मस्ती करता येणार आहे.
शनिवारी आणि रविवारी माथेरान स्टेशन ते अमन लॉज सकाळी ८.२०,९.१०,१०.०५ व ११.३५ अशा फेऱ्या असतील. दुपारी १.१०,२.००व ३.१५ तर सायंकाळी ४.३० व ५.२० अशा फेऱ्या होतील. अमन लॉज ते माथेरान दरम्यान सकाळी ८.४५, ९.३५ आणि १०.३० अशा फेऱ्या तर दुपारी १२.००,१.३५,२.२५ व ३.४० तसेच सायंकाळी ४.५५ आणि ५.४५ अशा फेऱ्या चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
खासदारांची होती सूचना
ही समस्या माथेरानच्या शिष्टमंडळाने खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी मध्य रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजनांसाठी सूचित केले. त्यानुसार फेऱ्यांत वाढ केली. यासाठी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, दिलीप कदम, पराग सुर्वे, माथेरान धनगर समाज माजी अध्यक्ष राकेश कोकळे आदींनी पाठपुरावा केला होता. नेरळ माथेरान ट्रेन पावसाळ्यात बंद झाल्यावर आणखीन फेऱ्या वाढविता येतील का याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे स्टेशन मास्टर जी.एस. मीना यांनी सांगितले.