करमुसे मारहाण प्रकरण: सरकार बदलताच जितेंद्र आव्हाड यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस
By जितेंद्र कालेकर | Published: August 11, 2022 09:34 PM2022-08-11T21:34:20+5:302022-08-11T21:34:43+5:30
Jitendra Awad: माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी मानवी हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार येत्या ९ सप्टेंबरपर्यंत आव्हाड यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी मानवी हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार येत्या ९ सप्टेंबरपर्यंत आव्हाड यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या करमुसे या स्थापत्य अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड यांना ऑक्टोबर २०२१ मध्ये ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. अटकेबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली होती. मात्र, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही घटना उघडकीस आणली. त्यांची या प्रकरणामध्ये दहा हजारांच्या जामिनावर सुटका केली होती. करमुसे यांना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले. आपणास १० ते १५ जणांनी लाठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. हा प्रकार आव्हाडांच्या उपस्थितीत घडल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई सुरक्षा दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह १० ते १२ आरोपींना अटक झाली होती. आता याच मारहाण प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगाने आव्हाड यांच्यासह मारहाण केल्याचा आरोप असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अलीकडेच नोटीस बजावली. कलम १६ नुसार आपले म्हणणे मांडण्याची संधी आयोगाने दिली असून ९ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास बजावले आहे. या संदर्भात आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.