कराटे प्रशिक्षकाला अटक
By admin | Published: July 8, 2017 03:55 AM2017-07-08T03:55:41+5:302017-07-08T03:55:41+5:30
कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्वजीत सिंग (४७) या प्रशिक्षकाने विद्यार्थिनीचा गेल्या दोन वर्षांपासून विनयभंग केल्याचा प्रकार राबोडीत घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्वजीत सिंग (४७) या प्रशिक्षकाने विद्यार्थिनीचा गेल्या दोन वर्षांपासून विनयभंग केल्याचा प्रकार राबोडीत घडला. पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली.
सिंग हा वृंदावन सोसायटीतील मुलांना कराटेचे प्रशिक्षण देतो. मे २०१५पासून तो तिला प्रशिक्षण देत होता. तेव्हापासूनच त्याने अनेकदा तिचा विनयभंग केला. परंतु, कराटे प्रशिक्षण समजून तिने दुर्लक्ष केले. तिने आईला सांगितल्यावर कराटेचे महत्त्व त्याने आईला पटवून दिले. त्यामुळे तिला पुन्हा क्लासला जावे लागले. क्लास संपल्यानंतर घरी येऊन हॉलमध्ये प्रशिक्षण देऊ लागला. पण, त्याच्या या हरकती वाढतच गेल्या. पुढे त्याने तिला धमकावून तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो मागविले. धमकी देऊन तिच्याशी चाळे सुरूच ठेवले. आईला हा प्रकार सांगितल्यानंतर तिने क्लास बंद केला. सर्वजीतने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आईशीही चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ६ जुलैला राबोडी पोलीसांत त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी विनयभंग, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आदी कलमांखाली हा गुन्हा दाखल केला. त्याला ठाणे न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.