रायते येथील डाॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे काेराेना रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 11:50 PM2021-04-23T23:50:32+5:302021-04-23T23:50:51+5:30
रुग्णाच्या मुलीचा आराेप : ऑक्सिजन संपल्याचे सांगून दिला डिस्चार्ज
लाेकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील रायते येथील कोविड रुग्णालय असलेल्या लक्ष्मी रुग्णालयात पाच दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या टिटवाळा येथील किसन म्हात्रे (वय ६९) या रुग्णाला ऑक्सिजन संपल्याचे सांगून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर काही तासांतच म्हात्रे यांचे टिटवाळा येथील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याबाबत म्हात्रे यांच्या मुलीने लक्ष्मी रुग्णालयातील डाॅक्टरांच्या उपचारांतील हलगर्जीपणामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा आराेप करून कारवाईची मागणी केली आहे.
किसन म्हात्रे यांना १६ एप्रिलला रायते येथील लक्ष्मी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, पाच दिवसांत त्यांच्या प्रकृतीत काेणतीच सुधारणा झाली नव्हती. याचदरम्यान येथील डॉ. दिनेश भोईर यांनी ऑक्सिजन संपले असल्याचे कारण देऊन सायंकाळी रुग्णाला दुसरीकडे हलविण्यास सांगितल्याचे मृताची मुलगी दीपाली भाटले यांनी सांगितले.
डाॅक्टरांकडे वडिलांच्या प्रकृतीबाबत चाैकशी केल्यास रुग्णामध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले जात हाेते. मात्र, २१ एप्रिलला डॉ. भोईर यांनी ऑक्सिजन संपणार असल्याचे कारण देऊन रुग्णाला हलवा, असे सांगितले़ तसेच बिलाचे एक लाख ४५ हजार रुपये भरणा करा, असे फर्माविले.
पूर्ण बिल अदा करीत असाल तरच रुग्णाला डिस्चार्ज देऊ, अशी भूमिका डॉ. भोईर यांनी घेतली. अखेर टिटवाळ्यातील समाजसेवक विजय देशेकर यांनी मध्यस्थी करून उद्या देतील, असे सांगून रात्री उशिरा रुग्णाला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर रात्री १०.३० वाजता रुग्णास टिटवाळ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे अर्ध्या तासातच किसन म्हात्रे यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, म्हात्रे यांची मुलगी दीपाली भाटले म्हणाल्या की, औषधांचे ५३ हजार रुपये बिल झाले होते, तर रुग्णालयाने एक लाख ४५ हजार रुपयांचे पाच दिवसांचे बिल काढले होते, तसेच माझ्या वडिलांचा २० तारखेला ईसीजी काढला होता. तो नॉर्मल नसल्याचे आमच्यापासून डॉक्टरांनी लपवले. त्यानंतर ऑक्सिजन संपल्याचा बहाणा करून त्यांना डिस्चार्ज दिला. त्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू लक्ष्मी रुग्णालयाच्या डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे.
याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात आली असल्याचेही भाटले यांनी सांगितले..
आराेपांबाबत डाॅक्टरांचा इन्कार
रायते येथील लक्ष्मी रुग्णालयाचे डॉ. दिनेश भोईर यांनी आराेपांचा इन्कार केला आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपणार असल्याचे त्यांना सायंकाळी सांगण्यात आले. त्यानंतरही त्यांनी रुग्णवाहिका रात्री उशिरा आणली, तसेच १७ इंजेक्शन त्यांना देऊन रेमडेसिविर आमच्याकडून एक तर त्यांनी दोन आणले होते, तसेच या बिलामध्ये ब्लड, एक्स-रे, पॅथॉलॉजी, मेडिकल आणि रुग्णालयातील ऑक्सिजन इत्यादी मिळून ५५ हजार रुपये घेतल्याचे डॉ. भोईर यांनी सांगितले.