डेक्कन एक्स्प्रेसचा कर्जत थांबा तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:43 AM2021-08-27T04:43:45+5:302021-08-27T04:43:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस पूर्वीपासून कर्जत रेल्वेस्थानकात अप आणि डाऊन प्रवासात थांबत होती. रेल्वे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस पूर्वीपासून कर्जत रेल्वेस्थानकात अप आणि डाऊन प्रवासात थांबत होती. रेल्वे प्रशासनाने अचानक डेक्कन एक्स्प्रेसचा कर्जत रेल्वेस्थानकातील थांबा रद्द करून आरक्षित तिकीट देणे बंद केले. गाडीचा कर्जतमधील थांबा पूूर्ववत सुरू करा व आरक्षण द्यावे, अशी मागणी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी गुरुवारी केली.
गंगावणे म्हणाले की, थांबा बंद केल्यामुळे कर्जत ते कल्याण रेल्वेस्थानकादरम्यान वास्तव्य करीत असलेल्या प्रवाशांना तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डेक्कन एक्स्प्रेससह इतरही अनेक मेल एक्स्प्रेस गाड्यांचाही कर्जत थांबा रद्द केला आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वे प्रशासनावर तीव्र नाराज आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने डेक्कन एक्स्प्रेसचा कर्जत थांबा सुरू करून आरक्षण दिले नाही तर रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवासी आंदोलन करतील.
दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. काही प्रमाणात निर्बंध शिथिल होऊन जनजीवन सुरळीत होत आहेत. परंतु, मध्य रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारामुळे प्रवाशांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत गंगावणे यांनी व्यक्त केली.
.........
वाचली