वर्तकनगरमध्ये सफाई कामगाराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 05:34 AM2018-09-11T05:34:18+5:302018-09-11T05:34:27+5:30
वर्तकनगर-भीमनगर भागातील एका सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर अनिल गाडेकर (२७) या सफाई कामगाराची हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.
ठाणे : वर्तकनगर-भीमनगर भागातील एका सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर अनिल गाडेकर (२७) या सफाई कामगाराची हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. वर्तकनगर पोलीस अनोळखी मारेकऱ्यांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोखरण रोड क्रमांक-२ भागातील रेप्टाकोर्स कंपनीमध्ये अनिल हा सफाई कामगार आहे. तो रविवारी रात्री ९.३० वा.च्या सुमारास दारूच्या नशेतच भीमनगर येथील त्याच्या घरी परतला होता. त्यानंतर थेट पहाटे ४ वा.च्या सुमारास तो सार्वजनिक गणपती मंडपासमोरील मोकळ्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे परिसरातील काही महिलांनी त्याची बहीण मनीषा वाघमारे (२०) आणि आई कौशल्या गाडेकर (६०) यांना सांगितले. त्याच्या गळ्यावर वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्याला पोलिसांच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, रक्तस्रावामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी आणि कोणी केली, याचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी सांगितले. वर्तकनगर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.