कर्नाळा खुणावतोय...

By admin | Published: January 14, 2017 06:14 AM2017-01-14T06:14:11+5:302017-01-14T06:14:11+5:30

कर्नाळाला जायचे तर, सोपा मार्ग म्हणजे पनवेल गाठा. तिथून एसटी स्टॅन्डमधून पेणच्या दिशेने जाणारी कोणतीही लोकल एसटी पकडा.

Karnala marking ... | कर्नाळा खुणावतोय...

कर्नाळा खुणावतोय...

Next

कर्नाळाला जायचे तर, सोपा मार्ग म्हणजे पनवेल गाठा. तिथून एसटी स्टॅन्डमधून पेणच्या दिशेने जाणारी कोणतीही लोकल एसटी पकडा. रिक्षादेखील उपलब्ध आहेत. गोवा हायवेला अगदी लागून असल्याने कर्नाळाला जाणे सोपे आहे. सगळ्या लोकल बसेस येथे थांबतात. तुमची गाडी, बाईक असेल तर गाडी पार्क करा, सॅक पाठीवर लावा आणि ट्रेकसाठी तय्यार व्हा...
कर्नाळा अभयारण्याचा परिसर तसा फार मोठा नाही. जेमतेम साडेचार-पाच चौरस किमी क्षेत्रफळात हे अभयारण्य पसरलेले आहे. ते मुख्यत्वे पक्षी अभयारण्य म्हणूनच प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचे पक्षीनिरीक्षणाचे हे आवडते स्थान होते. रोडपासूनच एक पायवाट जंगलात जाते. या वाटेवरच सुरुवातीला वन खात्याचा एन्ट्री पॉर्इंट आहे.
कर्नाळ्याच्या जंगलाला पावसाळ्यानंतर बहार आलेली असते. हिरव्यागार झाडीतून खुणावणारा कर्नाळ्याचा सुळका म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला सुळका आहे. समुद्रसपाटीपासून १५३८ फुटावर असलेला हा सुळका सर करण्यासाठी गिर्यारोहकांना नेहमीच खुणावत राहिला आहे. जंगलातील वाटेवर वन खात्याने एक छोटेसे प्राणीसंग्रहालय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जंगल पाहत, वेगवेगळ्या पक्षांचे आवाज ऐकत, वाटेत भवानी मातेचे एक छोटेसे मंदिर दिसले की, समजा आपण बरोबर रस्त्याने आहोत. या मंदिरापासून साधारणत: तासाभराचा ट्रेक तुम्हाला कर्नाळा किल्ल्यावर घेऊन जातो. किल्ल्यावर पोचलात की, टिफीन खा.. पाणी प्या.. समोर पसरलेली हिरवीगार झाडी आणि त्यामधून जाणारा गोवा हायवे... उत्तरेकडे दिसणारे पनवेल.. सारं काही बघताना ट्रेकचा शीण जातो. इथे वाटल्यास थोडा आरामदेखील करता येतो.
कर्नाळ्याच्या ट्रेकमध्ये माकडांपासून तुमचे सामान सांभाळा. वरती किल्ल्यावर पाहण्यासारखे तसे फारसे काहीच नाही. मात्र हौसेखातर, स्टंटबाजी करायला कर्नाळ्याचा थम्स अप म्हणजे तो सुळका चढायच्या वगैरे भानगडीत पडू नका. हा सुळका सर करायचे तर, अनुभवी गिर्यारोहकच हवा आणि पूर्ण तयारीनिशी येथे यायला लागते. किल्ल्याच्या वरच्या अंगाला मधमाश्यांची पोळी लटकलेली दिसतात, त्यामुळे येथे येऊन शेकोटी पेटवणे, जेवण करणे असले प्रकार टाळा.. मधमाशांना डिवचू नका नाहीतर तुमची काही खैर नाही. थोडा आराम झाला, फ्रेश झाला असाल तर, किल्ला उतरायला सुरुवात करायला हरकत नाही.
कर्नाळा अभयारण्यातूनच गोवा नॅशनल हायवे जात असल्याने येथे पोचणे सोपे आहे. मात्र जवळपास खाण्यापिण्याची काही सोय नाही. वन खात्याची चौकी व छोटे निवासस्थान येथे आहे. त्याचे बुकींग मात्र ठाणे तीन हात नाका येथील वन खात्याच्या कार्यालयातून करता येते.
कर्नाळयाचा ट्रेक तसा नवशिक्या हौशी ट्रेकर्सनादेखील सोपा आहे. अगदीच ट्रेकचा कंटाळा आला तर, जंगल दर्शन करून फ्रेश होऊन परतता येईल. मात्र येथे येताना पाणी व भरपूर टिफीन सोबत ठेवा. सायंकाळी ६ नंतर अभयारण्यातील प्रवेश बंद होतो. पक्षी निरीक्षणासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा मोसम ठिक असतो.
 - शशिकांत कोठेकर

Web Title: Karnala marking ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.