कर्ता माणूसच गेला, आता जगायचे तरी कुणाच्या आधारावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:48 AM2020-07-20T00:48:15+5:302020-07-20T00:48:33+5:30

रुग्णालयाच्या समोरच त्यांची प्राणज्योत मालवली. आता आम्ही निराधार झालो आहोत.

Karta manusca gone, now on what basis to live? | कर्ता माणूसच गेला, आता जगायचे तरी कुणाच्या आधारावर?

कर्ता माणूसच गेला, आता जगायचे तरी कुणाच्या आधारावर?

Next

- मुरलीधर भवार 

कल्याण : माझे पती तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा गाडा हाकत होते. पगार कमी असूनही कोरोनाच्या काळात हातचे काम जाऊ नये, यासाठी कामावर कसेबसे पोहोचून मिळेल ते वाहन पकडून घरी रात्री उशिरा १ वाजता पोहोचत होते. अशातच त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना वेळीच आॅक्सिजन बेड व उपचार मिळाले नाही.

रुग्णालयाच्या समोरच त्यांची प्राणज्योत मालवली. आता आम्ही निराधार झालो आहोत. कुटुंबाचा प्रमुख आमच्यातून निघून गेला आहे. मुलींचे शिक्षण व सांभाळ कसा करायचा, घर कसे चालवायचे, लॉकडाऊन तर अद्याप संपलेला नाही. त्यामुळे मी मुलींना घेऊन गाव गाठले आहे. पुढील जीवन कोणाच्या आधारावर जगायचे, असा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे, अशी व्यथा कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले अशोक पूर्ववंशी यांच्या पत्नी राणी यांनी मांडली आहे.

राणी यांचे पती अशोक (४३), मुलगी अनन्या (११) व आरोही (४) हे वालधुनी परिसरातील एका लहान फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्या या लहानशा घरात त्यांचा विवाहित दीर आलोक, त्याची पत्नी, दोन मुले हेही राहतात. अशोक हे नवी मुंबईतील एका सिव्हील कंपनीत कामाला होते. त्यांना महिन्याला १२ हजार रुपये पगार होता. या पगारात ते पत्नी व मुलींचा सांभाळ करीत होते.

एके दिवशी त्यांना ताप आला. डॉक्टरांनी त्यांना रक्ताची चाचणी करण्यास सांगितले. या चाचणीच्या अहवालानुसार त्यांना टायफॉइड झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याकरिता त्यांच्या बहिणीचे पती सुरेंद्र सिंग यांनी धावपळ केली. तेव्हा कोरोना चाचणी केल्याशिवाय त्यांना दाखल करून घेता येणार नाही, असे सांगण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी १७ जून रोजी झाली. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना १८ जूनपासून रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ करावी लागली.

कुठेच बेड उपलब्ध होत नव्हता. त्यांना महापालिकेने अधिग्रहीत केलेल्या होलीक्रॉस रुग्णालयात नेले असता त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल प्रलंबित असल्याने त्यांना दाखल करून घेतले नाही. त्यांना महापालिकेच्या रुकिमणीबाई रुग्णालयात दाखल करून घेतले. मात्र, त्याठिकाणी आॅक्सिजनची सुविधा नव्हती. त्यामुळे पुढील उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णालय किंवा मुंबईतील केईएम रुग्णालयात न्या, असे सांगितले गेले. या सगळ्या प्रक्रियेत बराच वेळ वाया गेल्याने अशोक यांचा रुकिमणीबाई रुग्णालयासमोर रात्री १ वाजता मृत्यू झाला.

अशोक यांच्या मृत्यूपश्चात दोन दिवसांनी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. या धावपळीचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला त्यांचा लहान भाऊ आलोक याला जबर मानसिक धक्का बसला. त्यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर १९ जूनपासून डोंबिवलीतील आर.आर. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आलोकही तुटपुंज्या पगारावर त्याच्या कुटुंबाची गुजराण भावासोबत लहानशा प्लॅटमध्ये राहून करत होता. त्यामुळे आलोक हा त्याच्या कुटुंबाचे पाहणार की, मृत भावाच्या कुटुंबाची देखभाल करणार, असा प्रश्न आहे. अशोकच्या बहिणीचे पती सुरेंद्र सिंग यांनी अशोकच्या मुली व पत्नीला त्यांच्या आग्रा येथील मूळ गावी पाठवून दिले आहे. त्याठिकाणी त्यांच्या जवळचे कोणी नाही. कोरोनाने पूर्ववंशी यांच्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे.

अशोक पूर्ववंशी तुटपुंज्या पगारात मुलींचे शिक्षण करीत होते. त्यांची मोठी मुलगी अनन्या ही गुरुनानक शाळेत शिक्षण घेते, तर लहान मुलगी आरोहीला त्यांनी के.सी. गांधी इंग्रजी शाळेत टाकले होते. त्यांनी तिचा प्रवेश डोनेशन भरून निश्चित केला होता. काम थांबले तर पगार थांबणार, यामुळे कोरोनातही अशोक कामाला जात होते. रात्री उशिरा ते कामावरून घरी परतत होते.

Web Title: Karta manusca gone, now on what basis to live?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.