पोलीस आणि खासगी गाड्यांचे काशिमिरा उड्डाणपुलाखालील मार्गावर अतिक्रमण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 11:02 PM2019-06-16T23:02:45+5:302019-06-16T23:02:57+5:30
काशिमीरा उड्डाणपुला खाली पोलीस ठाण्यासमोरच्या मार्गावर पोलीस आणि खाजगी लोकांच्या गाड्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक व रहदारीला अडथळा होत आहे.
मीरारोड - काशिमीरा उड्डाणपुला खाली पोलीस ठाण्यासमोरच्या मार्गावर पोलीस आणि खाजगी लोकांच्या गाड्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक व रहदारीला अडथळा होत आहे.
काशिमिरा उड्डाण पूल झाल्यानंतर पोलीस ठाण्यासमोरील असणाऱ्या मुख्य नाक्यावरुन मीरा भाईंदर शहरातून मुंबईकडे जाणारी तर ठाणे, वसई, काशिमिरासह अन्य लांब भागातून मीरा भाईंदरकडे जाणारी वाहने याच पुलाखालील मार्गिकेमधून जातात. त्यामुळे नेहमीच येथे वाहनांची गर्दी असते. त्यातच बस, खाजगी वाहनाचा प्रवास करून आलेले नागरिक काशिमिरा नाक्यावर उतरतात. शिवाय पोलीस ठाणे तसेच मुंबईला जाण्यासाठी याच पुलाखालील मार्गिकेचा वापर करावा लागतो.
शहरात ये - जा करणाराया वाहनांची वर्दळ असल्याने पुलाखालील मार्गिकेवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. पादाचारींना तर चालणे जीकरीचे ठरते. बहुतांश वेळा येथे वाहतुकीच्या नियोजनासाठी कोणीच नसते. शिवाय येथे कोणतीच सिग्नल यंत्रणा नाही. त्यात भर म्हणजे पोलीसच आपल्या चारचाकी - दुचाकी गाड्या सर्रास या मार्गिकेच्या दोन्ही दिशेला उभ्या करतात.
पोलीस गाड्या लावतात म्हणून काही खाजगी मंडळी देखील बेकायदा वाहने उभी करुन जातात. वास्तविक पोलीस ठाणे आवारात तसेच पुला खालील मोकळ्या जागेत वाहने उभी करण्याची सोय असताना देखील पोलिसांकडून रस्त्याचा वापर केला जातोय.