काशिमीरा भागातील बनावट कीटकनाशकांचा कारखाना उघडकीस, अग्निशमन दलाने ठोकले सील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:54 AM2019-05-08T02:54:22+5:302019-05-08T02:54:51+5:30
काशिमीरा भागातील डाचकुलपाड्यात एका बेकायदा पत्रा गोदामात बनावट किटकनाशक स्प्रे बनवण्याचा कारखानाच चालवला जात असल्याचे उघड झाले आहे.
मीरा रोड : काशिमीरा भागातील डाचकुलपाड्यात एका बेकायदा पत्रा गोदामात बनावट किटकनाशक स्प्रे बनवण्याचा कारखानाच चालवला जात असल्याचे उघड झाले आहे. रहिवाशांनी गॅस गळतीच्या तक्रारी केल्यानंतर अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सदर बनावट किटकनाशक स्प्रेचा कारखाना आढळून आला. याप्रकरणी २४ गॅस सिलेंडर, ४०० रिकामे स्प्रे, किटकनाशक केमीकल आदींसह यंत्र सामुग्री जप्त करून कारखाना सील केला आहे. गॅस गळती वेळीच थांबवल्याने दुर्घटना टळल्याचे रहिवासी म्हणाले.
काशिमीऱ्याच्या डाचकुलपाडा भागात राहणाºया रहिवाशांना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कारखान्यातून गॅस गळतीच्या दुर्गंधीचा त्रास होऊ लागला. रहिवाशांनी याची माहिती स्थानिक भाजप नगरसेवक सचीन केसरीनाथ म्हात्रे यांना दिल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यावेळी आतमध्ये किटकनाशक स्प्रे भरण्याचे काम चालले होते. जमावाला पाहून १० ते १२ कामगार पळून गेले.
म्हात्रे यांनी काशिमीरा पोलीस ठाणे आणि पालिकेच्या अग्निशमन दलास याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आधी स्प्रे भरण्यासाठी जोडलेल्या गॅसच्या जोडण्या काढून गॅस गळती थांबवली. त्यानंतर घटनास्थळी असलेले साहित्य गोळा करायला सुरवात केली. भारत गॅसचे २४ गॅस सिलेंडर, स्प्रेच्या ४०० रिकाम्या बाटल्या, हिट आदी नाव असलेल्या जुन्या भरलेल्या तसेच रीकाम्या बाटल्या, तीन बॅरल भरुन असलेले केमीकल, स्प्रे भरण्यासाठीची यंत्र सामुग्री आदी साठा आढळून आला. वीज पुरवठा बंद करुन कारखान्यास लगेच टाळे ठोकण्यात आले.
त्यानंतर मंगळवारी दुपारी अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान साठा जप्त करण्यास गेले होते. त्यावेळी स्प्रे भरलेल्या बाटल्यांचे बाहेरील उष्णतेमुळे स्फोट होऊ लागले. त्यामुळे त्या बाटल्या पुन्हा कारखान्यात सावलीत ठेवण्यात आल्या.
याप्रकरणी बुधवारी काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याचे प्रभारी मुख्य अग्निशमन दल अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले. गफुर शेख नावाच्या इसमाचा हा कारखाना असल्याचे समोर आले असून, अग्नीशमन दलापासून अन्य कोणतीही आवश्यक परवानगी नसल्याची माहिती त्यांनी दिली.