काश्मिरी मुलींच्या नृत्याने भरले रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:51 AM2019-04-06T04:51:12+5:302019-04-06T04:52:26+5:30
नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम : ढोलताशे, लेझीम, तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर
डोंबिवली : नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोलताशांचे वादन, विद्यार्थ्यांचे लेझीम, नृत्य आणि तलवारबाजीने डोळ्यांचे पारणे फेडले. विशेष म्हणजे, भागशाळा मैदानात सादर झालेल्या ‘काश्मिरी रंगा’मुळे पूर्वसंध्या आणखीनच रंगीत ठरली.
काश्मीरहून आलेल्या २३ मुलांनी काश्मीरमधील लोकगीतावर नृत्य सादर केले. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. काश्मीरच्या लेह-लडाख खोऱ्यातील गावांतून ही मुले खास गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीत आली आहेत. ‘हम’ या संस्थेचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी या मुलांना डोंबिवलीत आणले आहे. तसेच त्यांना मुंबईदर्शन घडवण्यात येणार आहे. काश्मिरी मुलगी रुची शर्मा हिने सांगितले की, मला हे सगळे नवीन आहे. नववर्ष स्वागतयात्रा मला पाहायची आहे. गुढी काय असते, हे जाणून घ्यायचे आहे. त्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. हिताका देवी हिने सांगितले की, देशाची संस्कृती अत्यंत महान आहे. नववर्ष स्वागतयात्रा व गुढीपाडव्याचा आम्ही उद्या एक भाग होणार आहोत.
निवृत्त मेजर अच्युत देव यांनी आपल्या देशात शत्रूंचा शिरकाव होणार नाही, असे वातावरण तयार केले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले.
वरदविनायक झांज पथकाने चौगुला, बांबू डान्स आणि पलटा नृत्य प्रकार सादर केला. वक्रतुंड ढोलताशा पथकाने त्यांचे वादन सादर केले.
पूर्वेतील राजाजी पथ येथे ढोलताशावादन करण्यात आले. स्वामी विवेकानंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करून लेझीमचा ताल धरला.
त्याचबरोबर पूर्वेतील चंद्रकांत पाटकर शाळेच्या पटांगणावर ढोलताशावादन झाले. यावेळी डोंबिवलीतील बालगायकांनी गाणी सादर केली. तर, पश्चिमेतील आनंदनगर येथेही ढोलताशावादन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यालाही नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
६० चित्ररथांचा सहभाग
गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा काढण्याची परंपरा सर्वात पहिल्यांदा डोंबिवलीत सुरू झाली. शनिवारी निघणाऱ्या या यात्रेत ६० चित्ररथ, १५० सायकलस्वार सहभागी होणार आहे. त्याचबरोबर दोन लाख नागरिक सहभागी होतील, असा अंदाज श्री गणेश मंदिर संस्था आणि नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतर्फ वर्तवण्यात आला.
‘दक्ष सैनिक, नागरिक’ रांगोळी सर्वांचे आकर्षण
डोंबिवली :‘दक्ष सैनिक देशाचा, दक्ष नागरिक शहराचा’... असा संदेश देत श्री गणेश मंदिर संस्थान, नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समिती आणि संस्कार भारतीने भव्य महारांगोळी साकारली आहे. ही रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने संस्कार भारती १५ वर्षांपासून शहरात रांगोळी काढत आहे. संस्था रांगोळीच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांना हात घालत जनजागृती करत आहे. यंदाची रांगोळी ४५ बाय १२ फुटांची आहे. त्यासाठी १५० किलो रंग आणि ८० किलो रांगोळी लागली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी ३५ ते ४० कलाकारांना आठ तास लागले.
देशाचा सैनिक हा सीमेवर आपले कर्तव्य चोख बजावत आहे. आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी योग्यरीत्या बजावण्याची गरज आहे, या संकल्पनेवर ही रांगोळी साकारली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर जपून करावा, भ्रष्टाचार टाळावा, स्वच्छतेतून परिवर्तन घडवून आणले पाहिजे. माध्यमांचा वापर योग्यरीतीने केला पाहिजे, नियमांचे पालन केले पाहिजे, या गोष्टींची जनजागृती रांगोळीतून केली आहे. रांगोळीत भारतीय सैन्यदल, सैनिक, ध्वज, भारताची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर शनिवारी स्वागतयात्रेच्या दिवशी फडके रोड आणि डोंबिवली पश्चिमेतील चौकाचौकांत रांगोळी साकारण्यात येणार आहे, अशी माहिती संस्कार भारतीचे उमेश पांचाळ यांनी दिली.