नौदल तळाजवळून काश्मिरी तरुणास अटक, मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:33 AM2018-01-04T04:33:50+5:302018-01-04T04:34:05+5:30
ठाणे - येथील कोलशेत भागातील नौदल तळाजवळून मंगळवारी एका काश्मिरी तरुणास अटक करण्यात आली. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे - येथील कोलशेत भागातील नौदल तळाजवळून मंगळवारी एका काश्मिरी तरुणास अटक करण्यात आली. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्यातील कोलशेत भागात नौदलाचा तळ आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा भाग सामान्य नागरिकांसाठी प्रतिबंधित आहे. नौदलाच्या संपूर्ण तळास आवारभिंत असून तो भाग अतिसंरक्षित आहे. या आवारभिंतीला लागून असलेल्या झाडीमध्ये मंगळवारी दुपारी एक युवक संशयास्पद स्थितीत सुरक्षारक्षकांना आढळला. नौदलाच्या अधिकाºयांनी ही बाब कापूरबावडी पोलिसांना कळविली.
विषय संवेदनशील असल्याने दहशतवादविरोधी पथकाला बोलावण्यात आले. त्यांनी कारवाई करीत काश्मिरी युवकास ताब्यात घेतले. दहशतवादविरोधी पथकाने चौकशी केली असता युवकाचे नाव शौकत अहमद कासम खटानन सैद असल्याचे समजले. ३५ वर्षीय शौकत श्रीनगर जिल्ह्यातील अनंतनागचा रहिवासी आहे. तो विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी पत्नी त्याला सोडून गेली. त्याची मानसिक स्थिती ढासळलेली असून पत्नीच्या शोधात तो दीड महिन्यापासून वणवण फिरत आहे.
मंगळवारी सायंकाळी कापूरबावडी पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करून शौकतला अटक केली. बुधवारी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अनंतनागमधील अच्छाबल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेखपुरा परिसरात शौकतच्या आईचे वास्तव्य आहे. तिला कारवाईची माहिती दिल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या सूत्रांनी सांगितले.