कासकर थेट दाऊद, शकीलच्या संपर्कात, चारही आरोपी मकोका कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 06:35 AM2017-10-26T06:35:40+5:302017-10-26T06:35:53+5:30
ठाणे : इक्बाल कासकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या थेट संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयासमोर बुधवारी केला.
ठाणे : इक्बाल कासकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या थेट संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयासमोर बुधवारी केला. आरोपीच्या मोबाइल फोनच्या तपशिलातून ही माहिती समोर आली असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले.
एका बिल्डरकडून खंडणी उकळल्याप्रकरणी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, त्याचे हस्तक मुमताज एजाज शेख, इसरार जमीर अली सय्यद आणि छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर यांना खंडणीविरोधी पथकाने सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध खंडणीचे तीन गुन्हे दोन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. एक महिना ते पोलीस कोठडीत होते. यादरम्यान तपासातून संघटित गुन्हेगारीवर शिक्कामोर्तब झाल्याने त्यांच्याविरुद्ध मकोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली. त्यानुसार, बुधवारी चारही आरोपींना ठाण्याच्या विशेष मकोका न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
खंडणीविरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त एन.टी. कदम यांनी यावेळी पोलिसांची बाजू न्यायालयासमोर मांडली. इक्बाल कासकरच्या मोबाइल फोनचा तपशील खंडणीविरोधी पथकाने संबंधित कंपनीकडून मागवला होता. कासकर थेट दाऊद आणि शकीलच्या संपर्कात असल्याचे या तपशिलातून स्पष्ट झाले. दोन वर्षांमध्ये त्याने शंभरपेक्षा जास्त वेळा दाऊद आणि शकीलशी संपर्क साधला. याशिवाय, त्याने दुबईलाही मोठ्या प्रमाणात कॉल्स केले. यासाठी व्हीओआयपी कॉल्ससह स्काइप आणि इमोसारख्या अॅप्लिकेशन्सचाही वापर केल्याचा दावा पोलिसांनी या वेळी केला.
आरोपींच्या सखोल चौकशीसाठी त्यांना कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाला केली. पोलिसांच्या दाव्यांमध्ये नवे काहीच नसल्याचे सांगत कासकरचे वकील श्याम केसवानी यांनी कोठडीस विरोध दर्शवला. न्यायालयाने इक्बाल कासकरसह चौघांना ४ नोव्हेंबरपर्यंत मकोका कोठडी सुनावली.
>दोन आरोपी फरारच
आरोपी खंडणीसाठी बिहारच्या शूटर्सचा वापर करत होते. आरोपींच्या चौकशीतून शम्मी आणि गुड्डू नामक दोन शूटर्सचा तपशील पोलिसांना मिळाला आहे. हे दोन्ही आरोपी फरार आहेत. त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आरोपींना कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयासमोर केली.