सत्तेसाठी शिवसेनेच्या मार्गात काटेच काटे

By admin | Published: January 30, 2017 01:34 AM2017-01-30T01:34:41+5:302017-01-30T01:34:41+5:30

विधानसभा तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेप्रमाणेच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत अखेर २५ वर्षांची युती संपुष्टात आली आहे.

Katech Kate in the way of Shivsena to power | सत्तेसाठी शिवसेनेच्या मार्गात काटेच काटे

सत्तेसाठी शिवसेनेच्या मार्गात काटेच काटे

Next

- अजित मांडके, ठाणे
विधानसभा तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेप्रमाणेच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत अखेर २५ वर्षांची युती संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, असा रंगणारा सामना शिवसेना विरुद्ध भाजपा आणि राष्ट्रवादी असा रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या कामांचा समाचार घेतला जात होता. परंतु, आता त्यांच्या जोडीला भाजपाचीही जोड मिळणार आहे. शिवसेनेकडून जरी एकहाती सत्ता स्थापनेचे स्वप्न रंगवले जात असले, तरी ते कल्याण-डोंबिवलीसारखेच कठीण होणार असल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीत जरी शिवसेनेला पहिल्या क्रमांकाची मते मिळाली असली, तरीही भाजपानेदेखील त्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे शिवसेनेपुढेही चिंतेची बाब आहे. त्यात मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील काही निष्ठावानदेखील भाजपात दाखल झाल्याने शिवसेनेपुढेही चिंता वाढली आहे. असे असले तरी मागील निवडणुकीत ऐन वेळेस जशी बंडखोरी झाली होती, तशी आताच्या निवडणुकीत होऊ नये, यासाठीदेखील काळजी घ्यावी लागणार आहे. एकूणच सत्ता साकारण्याच्या स्वप्नात त्यांचाच मित्रपक्ष त्यांच्याविरोधात मैदानात असल्याने एकहाती सत्तेची स्वप्नं साकारण्याच्या मार्गात काटेचकाटे आहेत, असेच काहीसे दिसत आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती अखेर तुटली आहे. आता हे दोन्ही मित्रपक्ष स्वबळावर लढणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेत २५ वर्षांपासून एकमेकांच्या हातात हात घालून प्रत्येक महापालिका निवडणूक लढणारे हे दोन मित्रपक्ष महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आमनेसामने येणार आहेत.
२०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुका लढले होते. त्या वेळेस महापालिकेच्या हद्दीतील चारही विधानसभा मतदारसंघांतील मतांची गोळाबेरीज केली असता, शिवसेनेने चारपैकी दोन ठिकाणी विजय मिळवला होता. परंतु, भाजपाने प्रथमच २९ वर्षांनंतर शिवसेनेला धक्का देत आपला ठाणे शहर मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. राष्ट्रवादीला एक जागा जिंकता आली होती. शिवसेनेला या चारही मतदारसंघांत मिळून २ लाख ६५ हजार १३ मते मिळाली होती. त्यात त्यांना १ लाख १४८ ही सर्वाधिक मते कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मिळाली होती, तर भाजपाला चारही मतदारसंघांत मिळून एकूण १ लाख ८९ हजार २२७ मते मिळाली होती. त्यांना ठाणे शहर मतदारसंघात ७० हजार ८८४ इतकी मते मिळाली होती. त्या वेळी कळवा-मुंब्रा हा मतदारसंघ वगळता इतर तीन ठिकाणी शिवसेना आणि भाजपातच प्रमुख लढती झाल्या होत्या. त्या अनुषंगाने या ठाणे महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढणाऱ्या या दोन पक्षांची ताकद कशी असेल, त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, यादृष्टीने कोपरी-पाचपाखाडी आणि ठाणे शहर या दोन मतदारसंघांसोबतच ओवळा-माजिवड्यातही रंगतदार लढती पाहावयास मिळणार आहेत. असे असले तरी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र येथे भाजपा कडवे आव्हान देणार असल्याने त्यांना हा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
दुसरीकडे शिवसेनेने २५ वर्षे केवळ वापर करून घेतला असल्याची टीकाही आता भाजपाकडून होऊ लागली आहे. २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाचे १४ नगरसेवक निवडून आले होते. परंतु, २०१२ च्या निवडणुकीत ही संख्या ८ वर घसरली. त्यामुळे घटलेले नगरसेवक वाढवण्यासाठी आणि शिवसेनेवर आसूड ओढण्यासाठी भाजपाने आता स्वबळावर निवडणूक लढवून पूर्वीच्या मानापमानाचा बदला घेण्याचे निश्चित केले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेप्रमाणे भाजपा येथेही शिवसेनेला घाम फोडण्यासाठी आक्रमक होणार आहे. त्यातही मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडून होणाऱ्या शाब्दिक हल्ल्यांमुळे शिवसेना कावरीबावरी झाली आहे. त्यांना कशा पद्धतीने सामोरे जायचे, असा पेच सध्या शिवसेनेला सतावत आहे. असे असताना आता भाजपाही २५ वर्षांत शिवसेनेने काय केले, कोणते भ्रष्टाचार केले, कामे अपूर्ण कशी ठेवली, आदींसह इतर कारणांचा मागोवा घेऊन शिवसेनेवर आगपाखड करण्याच्या तयारीत आहे. त्यात, शिवसेनेतील काही निष्ठावान मंडळीही भाजपात डेरेदाखल झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. यापाठोपाठ, राष्ट्रवादी आणि आता भाजपाकडूनदेखील धक्के बसणार आहेत. हे धक्के पचवून प्रचारात आघाडी घेण्यासाठी आणि झालेल्या आरोपांना तेवढ्याच ताकदीने टोलवून लावण्यासाठी सेनेलादेखील आता व्यूहरचना आखावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, केवळ बंडखोरी थोपवण्यासाठी आणि त्याचा फटका अधिक प्रकर्षाने बसू नये, म्हणूनच शिवसेनेने ही युती तोडल्याची चर्चा सुरू झाली आहे. २०१२ मध्येदेखील सेनेने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाआधी यादी जाहीर केली होती. तरीही बंडखोरी झाली होती. युती झाली असती, तर ही बंडखोरी अधिक प्रकर्षाने पुढे आली असती. परंतु, आता स्वबळावर लढल्याने काही अंशी का होईना, ही बंडखोरी थोपवण्यात सेनेला यश येणार आहे. असे जरी असले तरी तीनही दिशांहून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होणार आहे. या कोंडीतून बाहेर पडून सेनेला सत्ता स्थापनेचे सोपस्कार साकारावे लागणार आहे. एकूणच सत्तेच्या वाटेत आता काटेचकाटे आहेत, अशीच म्हणण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.

Web Title: Katech Kate in the way of Shivsena to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.