काठ अँड घाट हॉटेल्सला आग; पहिल्या मजल्यावरील लाकडी साहित्याचे नुकसान
By अजित मांडके | Published: June 27, 2023 12:53 PM2023-06-27T12:53:34+5:302023-06-27T12:53:49+5:30
ही आग चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आली असून यामध्ये लाकडी साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
ठाणे : पांचपाखाडी नितीन कंपनी सर्विस रोडवरील तळ अधिक एक मजली असलेल्या मे.काठ अँड घाट हॉटेल्सला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास समोर आली. ही आग हॉटेल्सच्या पहिल्या मजल्यावरील लाकडी साहित्याला लागल्याने ती धुमसत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. तसेच ही आग चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आली असून यामध्ये लाकडी साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
मे. काठ अँड घाट नावाचे २५० स्क्वेअर फुटाचे तळ अधिक एक मजली हॉटेल्स हे सनी पावसकर यांच्या मालकीचे असून तेथे लाकडाचा जास्त वापर करण्यात आला आहे. त्या हॉटेल्सला मंगळवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या आग लागली. अशी माहिती मिळताच घटनास्थळी नौपाडा पोलीस,आपत्ती व्यवस्थापन, महावितरण आणि अग्निशमन दल या विभागांनी तातडीने धाव घेतली. तर अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र फोम आणि लाकडी साहित्याला आग लागल्याने ती धुमसत होती.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाने ०२-पिकअप वाहनासह, ०१-जेसीबी वाहन ०१- ठामपा रुग्णवाहिका व अग्निशमन दलाने ०२-जीप वाहन ०३-फायर वाहन, ०१-रेस्क्यू वाहन, ०२-वॉटर टँकर वाहन पाचारण केले होते. ही आग सुमारे ०४ तासाच्या प्रयत्नानंतर पूर्णपणे नियंत्रण आली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.