'कौस्तुभ' खरा हिरो होता, शहीद मेजर राणेंच्या स्मारकाचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 02:57 PM2019-08-17T14:57:43+5:302019-08-17T15:04:46+5:30
७ ऑगस्ट २०१८ रोजी काश्मिर सीमेवर अतिरेक्यांना कंठस्रान घालत मीरारोडच्या शीतल नगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहिद झाले होते.
मीरारोड - शहिद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मरणार्थ मीरारोड रेल्वे स्थानका बाहेर उभारण्यात आलेल्या वीर स्मृति स्मारकाचे अनावरण शहिद यांचे आई-वडिल आणि पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्मारकाचे सन्मान आणि पावित्र्य कायम जपले जावे तसेच हे स्मारक देशसेवेची प्रेरणा प्रत्येकास देईल अशी आशा शहिद राणे यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. एका कवितेच्या मध्यमातुन शहिद कुटुंबियांचे सादर केलेल्या वर्णनास शहिद कुटुंबियांनी आक्षेप घेत संतप्त होऊन कार्यक्रम थांबवला.
७ ऑगस्ट २०१८ रोजी काश्मिर सीमेवर अतिरेक्यांना कंठस्रान घालत मीरारोडच्या शीतल नगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहिद झाले होते. शहिद मेजर यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता. कौस्तुभ यांचे स्मारक उभारण्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांनी आमदार निधी देण्याचे जाहिर केले होते. महापालिकेच्या माध्यमातुन मीरारोड रेल्वे स्थानका बाहेर वीर स्मृति स्मारक बांधण्यात आले आहे. त्याचे अनावरण स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी शहिद कौस्तुभ यांच्या आई ज्योती , वडिल प्रकाशकुमार व पत्नी कनीका यांच्या हस्ते केले गेले.
महापौर डिंपल मेहता, आमदार मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती अॅड. रवी व्यास, सभागृहनेते रोहिदास पाटील, पोलीस उपअधिक्षक शांताराम वळवी व भोसले सह नगरसेवक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महापालिकेचा कार्यक्रम असताना अनेक मीरारोड भागातील नगरसेवकांना तसेच माजी सैनिकांना खाली बसवले होते. पण पालिकेचे ८ लाख थकवणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांना मात्र व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवलं होत.
एका शहिद मेजर यांच्या स्मारक अनावरणाचा कार्यक्रम असताना माजी सैनिकांना मात्र व्यसपीठावर सोडाच पण मागच्या रागां मध्ये स्थान दिल्याने सैनिकांनी नाराजी व्यक्त केली. शहिद मेजर राणे यांच्या स्मारकास अभिवादन करुन ते कार्यक्रमातुन निघुन गेले. माजी सैनिकांनी देखील देशसेवा प्राणाची पर्वा न करता बजावली आहे. पण केवळ राजकिय प्रसिध्दीसाठी खटाटोप करताना माजी सैनिकांना मात्र असं अपमानास्पद वागवणं यांचा खरा चेहरा दाखवते असा संताप व्यक्त केला.
दरम्यान बोलावलेल्या एका हिंदी कवियत्रीने आपली कविता सादर करताना दिवाळी दिवशी शहिदची पत्नी आणि लहान मुलाबाबत केलेल्या वर्णनावरुन उपस्थित कौस्तुभ यांचे नातलग संतप्त झाले. त्यांनी उठुन कविता बंद करण्यास खडसावले. त्यामुळे कविता थांबवण्यात आली. सर्वच स्तब्ध झाले. शेवटी आ. मेहतांनी उठुन माफी मागीतली. आमची भावना कोणाला दुखवायची नव्हती, पुढचे वाक्य ऐकाल तर कळेल अशी सारवा सारव त्यांनी केली. माझा आमदार निधी शहिद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मारकासाठी दिला आणि आज भव्य दिव्य स्मारक झाले असं आ. मेहता म्हणाले. असे उपक्रम राबवुन शहरवासियांना प्रेरणा देणार आहोत, असेही मेहतांनी सांगितले.
आज जो मानसन्मान मिळतोय तो मुलामुळे. त्याने आम्हा कुटुंबाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे, असं ज्योती म्हणाल्या. कौस्तुभचा स्वभाव, निडरता आणि देशप्रेमामुळे त्याने सर्चोच्च बलिदान काय असते हे दाखवुन दिले. देशसेवेसाठी विधायक आणि खरं कार्य करा, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. देशसेवेसाठी शहरातील अनेक तरुण प्रेरणा घेऊन पुढे यावेत, अशी आशाही व्यक्त केली.
कनिका यांनी, माझ्या मुलासाठी मीच आई आणि बाबा आहे. त्याला त्याच्या बाबाची उणीव जाणवु देणार नाही. पती शहिद झाले त्या घटनेला आम्ही कुटुंबियाने कधी निराशेच्या दृष्टीने पाहिलेले नाही असं स्पष्ट केले. कौस्तुभ खरा हिरो होता. अशी स्मारकं झाली पाहिजेत. मुलं - तरुणांसाठी स्मारक प्रेरणा देणारे ठरेल असे कनिका म्हणाल्या.
मराठी एकीकरणचे प्रदिप सामंत, गोवर्धन देशमुख, सचीन घरत यांनी मात्र शहिदां बद्दलची दाखवली जात असलेली कणव म्हणजे मगरीचे अश्रु आहेत अशी टिका केली आहे. मेजर राणे शहिद झाले त्या दिवशी सायंकाळी आ. मेहता, महापौर, उपमहापौर व भाजपाचे नगरसेवक आदि शहिदाच्या घरा पासुन हाकेच्या अंतरावर आपल्या नगरसेवकाच्या बर्थडे पार्टीत जल्लोष करत होते. शासना कडुन दिली जाणारी सन्मान रक्कम पण आपण मिळवुन दिल्याचे श्रेय घेण्याचा निंदनिय प्रयत्न केला होता. हे सर्व लोकं विसरलेली नाहित. मराठी राजभाषा असुनही स्मारकाचे नामफलक अमराठी भाषेत तसेच कार्यक्रमात अमराठी भाषेचा वापर करणे राज्याच्या राजभाषेचा अपमानच नव्हे तर भाषाद्रोहच असल्याने आयुक्तांसह संंबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर कारवाई करा अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.