कुठल्याही भिक्षेकर्याला भीक देऊ नका पण त्याला मदत नक्की करा ! : डाॅ. अभिजित सोनावणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 04:33 PM2019-01-15T16:33:23+5:302019-01-15T16:35:36+5:30
कुठल्याही भिक्षेकर्याला भीक देऊ नका पण त्याला मदत नक्की करा असा सल्ला डाॅ. अभिजित सोनावणे यांनी दिला.
ठाणे - कुठल्याही भिक्षेकर्याला भीक देऊ नका पण त्याला मदत नक्की करा. भीक देणे म्हणजे भिक्षेकर्याला परावलंबी करणे आहे तर मदत करणे म्हणजे भिक्षेकर्याला स्वावलंबी बनविणे आहे, असे आर्जव भिक्षेकर्यांमध्ये कार्य करणाऱ्या डाॅ. अभिजित सोनावणे यांनी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफताना " डाॅक्टर फाॅर बेगर्स " या विषयावरील व्याखानात बोलताना उपस्थित प्रेक्षकांना केले.
यावेळी व्यासपीठावर डाॅ. सोनावणे यांच्या बरोबर भिक्षेकर्यामध्ये सक्रिय कार्य करणाऱ्या त्यांच्या पत्नी डाॅ. मनीषा सोनावणे याही आवर्जून उपस्थित होत्या. समतोल फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आ. संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, सुहास जावडेकर, सुभाष काळे, अशोक भोईर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जोशी यांनी केले. सरस्वती सेकंडरी स्कूलच्या क्रिडासंकुल पटांगणात या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
भिक्षेकर्यांमध्ये काम करताना पाहून प्रभावित झालेली लोक आम्हाला विचारतात, 'आम्ही भिक्षेकर्यांसाठी काय करायला हवे?' तेव्हा आम्ही सांगतो, कुठल्याही भिक्षेकर्याला भीक देऊ नका. भीक दिलीत, भीक देत राहिलात, सगळ्याच गोष्टी भिक्षेकर्यांना फुकट मिळू लागल्या तर ते कामच करणार नाहीत. गरम टोप्या, छत्र्या, चादरी, कपडे, अंथरुणे, गरम जेवण फुकटात मिळतात म्हटल्यावर आणि बसून 300 /400 रुपये भीक म्हणून बसून मिळतात म्हटल्यावर ते मेहनत करणार नाहीत. दोन रुपये भीक दिल्याने चारजण आपल्याकडे कर्णाचा अवतार म्हणून बघत असल्याचे पाहून आपला इगो सुखावतो पण आपल्या अशा वागण्याने आपण भिक्षेकर्यांना त्याच ठिकाणी, त्याच परिस्थितीत ठेवतो याची जाणीव आपल्याला नसते. यामुळे भुकेल्याला जेवण जरुर द्या पण फुकट खायची सवय लावू नका. भिक्षेकरी लहान मुले असतील तर वर्गणी काढा, त्यांना शिकवा, युनिफॉर्म द्या, पुस्तके द्या, अशी मदत करा पण भीक देऊ नका. भिक्षेकरी महिला असतील तर साड्या विकण्यासाठी मदत करा पण भीक देऊ नका. भिक्षेकरी वृध्द असेल तर चहा विकण्यासाठी मदत करा पण भीक देऊ नका. भिक्षेकर्यांना काम द्या. काम देता येत नसेल तर काहीच करु नका, पण भीक देऊ नका. आपली भीक आम्ही करत असलेल्या कामावर पाणी फिरवेल म्हणून कृपया भीक देऊ नका. भीक भिक्षेकर्यांना परावलंबी बनविते तर मदत स्वावलंबी करते म्हणून भीक देण्यापेक्षा भिक्षेकर्यांना मदत करा, असे आवाहन डाॅ अभिजित सोनावणे यांनी केले.
वडील सरकारी डाॅक्टर असलेल्या सामान्य घरातून डाॅक्टर झालो. डाॅक्टर झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे रहाण्याच्या उद्देशाने घरातून एकही पैसा न घेता 1999 साली पुण्यात येऊन वैद्यकीय व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला. जवळ पैसे नव्हते. मित्रांचेच कपडे, चपला घालत होतो. भाड्याने खोली घेऊन दवाखाना सुरु करणे शक्य नसल्याने झोपडपट्टीतच दवाखाना सुरु केला. तीन ते चार ठिकाणी असा प्रयत्न केला पण दवाखाना काही चालला नाही. यामुळे मग एका आजीबाईच्या सांगण्यावरून पुण्यातील खेड्यात 'होम डिलिव्हरी डाॅक्टर ' म्हणून घराघरातुन फिरु लागलो. पाच रुपये फी ठेवली होती. पाठीवर-पोटावर सॅक्स बांधलेला, केस वाढलेला, अजागळ वेशभूषा असलेल्या डाॅक्टरला घरात घ्यायलाच बर्याच लोकांनी नकार दिला. तर ज्यांनी उपचार करुन घेतले त्यांनी पाच रुपयातले दोनच रुपये दिले. असे पैसे न देणारे गडगंज श्रीमंत लोक होती. होम डिलिव्हरीचाही प्रयोग फसला. या सर्व स्थितीने प्रचंड निराश झालो. त्या गावातील शंकराच्या मंदिरातील एका कोपर्यात जाऊन, पैसे कमावण्यासाठी गुन्हेगारी मार्गाचा विचार करु लागलो. दुसर्या टोकाला एक आजी-आजोबा होते. तीन हाॅटेलचे मालक असलेल्या या आजीआजोबांना संपत्तीसाठी हाकलून दिल्याने त्यांनी या मंदिरात आसरा घेतला होता. त्यांना लोक रोज जेवण, पैसे देत असत. त्याच्याशी ओळख झाली. ते लोकांनी दिलेले शिळे अन्न स्वतः खात ताजे अन्न मला देत. पैसे नाहीत हे कळल्यावर ओंजळीत मावतील तेव्हढे पैसे मला देत.जे किमान 60/70 रुपये तरी असत. चारचाकी असणाऱ्या श्रीमंतांनी माझे 2/3 रुपये थकविले आणि या भिकारी समजल्या जाणाऱ्या आजी-आजोबांनी ओळख नसतानाही माझ्या ओंजळीत पैसे टाकले. मग श्रीमंत कोण आणि भिकारी कोण ? असा प्रश्न करुन करुन डाॅ. अभिजित सोनावणे म्हणाले की, याच बाबांनी माझ्या विचारांना दिशा दिली. मला सांगितले, " वरातीत नवरदेवाच्या पुढे लोक नाचतात तर अंतिम यात्रेत पार्थिवाच्या मागे लोक असतात. सुखात पुढे आणि दुखात मागे ही जीवनाची रित आहे. म्हणून जीवन म्हणजे काय तर जन्म आणि मृत्यू यांच्यामधले आयुष्य. यासाठी समाज ज्याला घाण म्हणतो तीच वस्तू हातात घेऊन स्वच्छ धुवून घे. वस्तु स्वच्छ होते, तिला मान मिळतो आणि आपले हातही स्वच्छ होतात, आपल्याला समाधान मिळते." माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे बाबांचे हे शब्द मला सतत आठवत राहीले, पिच्छा पुरवित राहिले. यामुळेच एका आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संस्थेत दोन लाख पगाराची नोकरी करत असताना आणि 12 लाख सॅलरीचे प्रमोशनाची ऑफर असताना ते सारे सोडुन मी व डाॅ मनीषा सोनावणे या माझ्या पत्नीने आपले सारे जीवन, आयुष्यभरासाठी भिक्षेकर्यांच्या सेवेसाठी वाहून घेतले, अशी ह्रदयस्पर्शी आठवण डाॅ अभिजित सोनावणे यांनी सांगितली.
भिक्षेकर्यांच्या कामासाठी संस्था सुरु केली. सुरुवातीला काय करायचे ते कळायचे नाही दोन महिने रस्त्यावरुन फिरत होतो. मग आम्ही देवळांना लक्ष्य केले. सोमवारी शंकर मंदिरात, गुरूवारी दत्त किंवा साई मंदिरात, मंगळवारी देवीच्या मंदिरात, शुक्रवारी गुरुद्वारा, दर्ग्यात, शनिवारी मारुतीच्या देवळात, रविवारी चर्चच्या दारात; भिक्षेकर्यांची गर्दी होत असल्याचे आमच्या लक्षात आले. मग आम्ही दोघे या भिक्षेकर्यांसारखेच त्यांच्या मध्ये मिसळू लागलो, त्यांच्याबरोबर बसणे, त्यांच्याबरोबर खाणे सुरु झाले, एक नाते सुरु झाले. मग आम्ही त्यांच्यावर रस्त्यावरच उपचार करु लागलो, गोळ्या-औषधे देऊ लागलो. रक्त तपासणी, ऑपरेशनसाठी, संपूर्ण ट्रीटमेन्टसाठी ओळखीच्या हाॅस्पिटल लागेल नेऊन उपचार झाल्यावर परत आणून सोडू लागलो. पण सेवाश्रृशुषा होऊन बरे झाल्यावर ते पुन्हा जास्त जोमाने भीक मागु लागले, भिक्षेकरी वाढायला लागले. आपले काहीतरी चुकते आहे ही जाणीव झाली आणि कामाची पध्दत बदलली. आमच्यातील निर्माण झालेल्या मुलगा, मुलगी,सून, जावई, पुतण्या, पुतणी या नात्याचा हवाला देत भावनेला हात घालून सांगितले की, "भीक मागणे सोडले नाहीत तर नाते तोडू आणि पुन्हा येणार नाही. " याचा ज्यांच्यावर परिणाम झाला त्यांना त्यांच्यातील पोटॅन्शियलप्रमाणे; फुले, पणत्या, चपला दुरुस्ती, केसकर्तन, चहा विकणे, कपडे शिवणे, मोलकरणीच्या, स्वयंपाकिणीची, बांधकाम मजुरी आदी कामे देऊन पायावर उभे केले. वृध्दांना वृध्दाश्रमात आश्रय मिळवून दिला. शेकडो भिक्षेकर्यांची मोतीबिंदू व इतर ऑपरेशन्स केली. फूटपाथवरच 16 वर्षे /20 वर्षे रहाणार्या अंध झालेल्या , शरीरात किडे पडलेल्या, पांगळे झालेल्या, वर्षानुवर्ष आंघोळ न केलेल्या, केस वाढलेल्या, अंगावरच कपड्यांची लक्तरे झालेल्या, घाणीत पडलेल्या, अशा विविध भिक्षेकर्यांची केस कापून, आंघोळ घालून त्यांना स्वच्छ करुन त्यांना मान मिळवून दिला, या भिक्षेकर्यांना स्वाभिमानाने जगायला शिकविले. पण मुळात नात्यातील माणसांना घराबाहेर काढले नाहीत तर भिक्षेकरी निर्माणच होणार नाहीत. यामुळे भविष्यात भिक्षेकरी निर्माण होणार नाहीत आणि हे काम बंद पडेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन डाॅ अभिजित सोनावणे यांनी केले.