‘कविता-रती’ पुरुषोत्तम!

By admin | Published: January 29, 2017 03:04 AM2017-01-29T03:04:43+5:302017-01-29T03:04:43+5:30

३० नोव्हेंबर १९८५ रोजी कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या स्मरणार्थ मराठी वाङ्मयीन वर्तुळात गणले जाणारे अतिशय महत्त्वाचे द्वैमासिक ‘कविता-रती’. कोणाच्याही अनुदानाशिवाय

'Kavita-Rati' Purushottam! | ‘कविता-रती’ पुरुषोत्तम!

‘कविता-रती’ पुरुषोत्तम!

Next

- रामदास खरे

३० नोव्हेंबर १९८५ रोजी कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या स्मरणार्थ मराठी वाङ्मयीन वर्तुळात गणले जाणारे अतिशय महत्त्वाचे द्वैमासिक ‘कविता-रती’. कोणाच्याही अनुदानाशिवाय चालणारे, फक्त वर्गणीदार आणि कविमंडळी यांच्याच बळावर एकदोन नव्हे तर तब्बल ३१ वर्षे हे मासिक व्रतस्थपणे चालवणारे कवी, संपादक पुरु षोत्तम पाटील. ‘अनुष्टुभ’सारख्या नियतकालिकाच्या संपादनाची शिदोरी उरी बाळगून उत्तमोत्तम कविता, कविताविचार, कविसमीक्षा आणि कविविमर्श या जणिवेला वाहून पाटील हे ‘कविता-रती’चे पुरुषोत्तमच!

पुरुषोत्तम पाटील यांनी १९४८पासून खऱ्या अर्थाने कवितालेखनास प्रारंभ केला. त्यांनतर तब्बल तीस वर्षाने, म्हणजेच १९७८मध्ये पहिला कवितासंग्रह ‘तळातल्या साउल्या’ प्रकाशित झाला. दुसरा कवितासंग्रह ‘परिदान’ पुन्हा तब्बल वीस वर्षाने, म्हणजेच १९९८ मध्ये आला. पाटील यांनी पुढे स्वत:चे कवितालेखन जवळ जवळ बंद करून इतर कवींचा जे सकस, ताजे आणि नवीन काही लिहू पाहत आहेत अशांचा जाणीवपूर्वक शोध, वेध घेतला. त्यांच्या संपादनात वाढलेल्या ‘कविता-रती’ने ३२व्या वर्षांत पदार्पण केले आहे. जवळजवळ तेराशे वर्गणीदार, आत्तापर्यंत दोनशे अंक प्रकाशित झालेत. त्यामधून सहाशे जुन्या-नवीन कवींचा सहभाग, त्यांच्या चार हजार कविता प्रकाशित झाल्या आहेत.
१९८५मध्ये देवपूर, धुळ्यासारख्या आडवळण्या छोटाशा गावामधून हा कवितेचा वसा एकहाती चालवणे हे काही साधे काम नव्हते. एकहाती म्हणजे लेखक-कवींना भेटणे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे, साहित्य गोळा करणे, ते तपासणे, त्यावर आपले मत व्यक्त करणे, छापायला देणे, वर्गणी गोळा करणे, त्याच्या पावत्या स्वत: बनवून त्या कवींना पाठवणे, वर्गणी संपल्याचे कळवणे, त्यासाठी पाठपुरावा करणे, टपाल टाकणे, तपासणे, वर्गणी संपली तरीही मोठ्या दिलाने पुढील एखादा अंक पाठवणे. अनेकवेळा स्वत:चे पैसे अंक उभारणीसाठी गुंतवून अंक वेळेवर प्रकाशित करणे. हे करत असताना कुठेही वाच्यता नाही. रडगाणे नाही, तक्रार नाही. जे काही करायचे ते आहे अतिशय शांतपणे, व्रतस्थपणे, निरपेक्षपणे आणि निरलसपणे. कविता-रती संपादनाच्या वेळी केवळ ‘उत्तम कविता’ निवडणे आणि ती प्रकाशित करणे हा एकमेव निकष प्रा. पाटीलसरांनी लावला.
हा ज्येष्ठ, हा कनिष्ठ, हा प्रस्थापित, हा नवोदित असे वर्गीकरण त्यांना अजिबात मान्य नव्हते. म्हणूनच त्यांच्या संपादनाचा कॅनव्हास विशाल आणि समृद्ध होत गेला. कुसुमाग्रज, पाडगावकर, नारायण सुर्वे, इंदिरा संत, ग्रेस ते दिलीप चित्रे, अरुण कोलटकरपासून थेट आजच्या पिढीपर्यंत प्रवीण बांदेकर, अजय कांडर, संतोष पवार, इथपर्यंत कवींच्या मांदियाळीनी कवितारती बहरली, फुलली.
प्रा. पाटीलसर एकेठिकाणी म्हणतात, ‘कविता-रती’तील कविता व काव्यसमीक्षा या दोहोंकडे बघता ही शिक्के मारण्याची, वर्गीकरणाची वृत्ती त्यातून तुम्हाला जाणवणार नाही. कविता कोणत्या शिक्क्याची आहे हे महत्त्वाचं नाही, तर ‘कवितापण’ कितपत शाबूत आहे, या कसोटीवर उतरलेल्या कविताच ‘कविता-रतीतून आलेल्या आहेत. कवितेची समीक्षा ही किती बहुविध असू शकते याचा प्रत्यय ‘कविता-रती’मधील काव्यसमीक्षा देते. तिथं कोणताही एक वर्ग प्रभावी नाही. ‘कविता-रती’ने नेहमीच काव्यन्मुख कवितेच्या ‘कवितापणा’वर लक्ष केंद्रित करणारी भूमिका घेतली आहे.’
प्रा. पुरु षोत्तम पाटील यांचा जन्म ३ मार्च १९२८, बहादरपूर, जिल्हा-जळगाव, खानदेशातला. ते मूळचे अमळनेर तालुक्यातील ढेकू या गावचे.
सातवीपर्यंतचे शिक्षण अमळनेर येथे, तर पुढील कॉलेज शिक्षणासाठी ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. पुण्यातील साहित्यिक वातावरण त्यांच्यासाठी पोषक ठरले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्राज्ञ परीक्षेत ते महाराष्ट्रात पहिले आले. आपटे पुरस्कारही लाभला. त्यांच्या कविता सत्यकथेत प्रसिद्ध होऊ लागल्या. मात्र १९८२ मध्ये सत्यकथा मासिक बंद पडले. पाटीलसरांना ते जिव्हारी लागले. अशाच धर्तीवर एखादे नियतकालिक आपणच का प्रकाशित करू नये, असा मनाशी निग्रह करून १९८५ मध्ये कवितारती हे द्वैमासिक अविरतपणे प्रकाशित होऊ लागले.
साहित्यक्षेत्रात अनेक लेखक-कवी मंडळी पुरु षोत्तम पाटील यांना आदराने ‘पुपाजी’ असे संबोधतात. ज्ञानपीठ विजेते ‘कुसुमाग्रज’ पुरु षोत्तम पाटील यांचे श्रद्धास्थान. कुसुमाग्रज एके ठिकाणी म्हणतात, ‘पुरु षोत्तम पाटील हे मराठीतील एक अव्वल दर्जाचे कवी आहेत. त्यांनी प्रेरणा बोरकरांसारख्या थोर कवींकडून घेतली असेल, पण त्यांची कविता कुठेही अनुकरणाच्या किंवा कुठल्याही प्रथेच्या आहारी गेलेली नाही. उद्यानातील एखाद्या एकाकी, बाजूला असलेल्या फूलवेलीसारखी ती तिच्याच आत्मानंदात आणि मग्नतेत फुलत राहिली.
अनुभवांचा आणि आविष्काराचा असा आणि इतका स्वतंत्र, अलिप्त वेगळेपणा फार थोड्या कवींत सापडू शकेल. थोडा जानपद वातावरणाचा शिडकावा असला तरी ही कविता कुठल्या वर्गीकरणात स्वत:ला बांधून घेत नाही. तिची संपूर्ण बांधिलकी स्वत:शी, स्वत:च्या भावप्रकृतीशी आहे.’
२००२ साली मी कवितारतीचा सभासद झालो आणि समृद्ध झालो. कविता म्हणजे काय? कविता अल्पाक्षरी कशी असावी याचे वेळोवेळी मार्गदर्शन सरांकडून मला लाभले, याचे समाधान आहेच. माझ्याकडे सरांची जवळजवळ पंधरा दुर्मिळ पत्रे आहेत. त्यातील २००६ आणि २००७ची दोन पत्रे दिली आहेत. त्यामध्ये कविता निवडीबद्दलचा स्प्ष्ट अभिप्राय दिला आहे. ती कधी स्वीकारणार? वर्गणी कधी संपणार आहे? पत्ता व्यविस्थत द्यावा, पत्रव्यवहारात कोड क्रमांक टाकावा असेही ते नमूद
करीत.
प्रत्येक कवीची काळजी ते अश्याप्रकारे घेत होते. आता तशी पत्रे येणार नाहीत कधीच! डोळे पाणावतात. अशी उत्तुंग माणसं झपाट्याने दुर्मिळ होत चालली आहेत. १६ जानेवारी २०१७. धुळे. कविता-रतीची खिन्न पाने वाऱ्यावर फडफडली, शांत झाली. कवितेची ही तेजस्वी ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याची जबाबदारी आता कविमंडळींची आहे हे नक्की.

Web Title: 'Kavita-Rati' Purushottam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.