काव्यमैफलीतून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
By admin | Published: July 3, 2017 06:23 AM2017-07-03T06:23:52+5:302017-07-03T06:23:52+5:30
शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाश टाकणाऱ्या विविध कविता आगरायन काव्यमैफलीत सादर झाल्या. यात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या, भूमिपुत्रांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाश टाकणाऱ्या विविध कविता आगरायन काव्यमैफलीत सादर झाल्या. यात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या, भूमिपुत्रांच्या व्यथा मांडणाऱ्या कवितांचादेखील समावेश होता. शेतकरी आतंकवादी वाटत आहे का, असा सणसणीत सवालदेखील कवितांच्या माध्यमातून करण्यात आला.
प्रकल्पग्रस्तांचे नेते, साडेबारा टक्के कायद्याचे प्रणेते दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त पनवेल येथे आगरी-मराठी कवितांची मैफल ‘आगरायन’ आयोजित करण्यात आली होती. दिबांना आगळीवेगळी काव्यमय आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्र माचे आयोजन पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने केले होते. पनवेलच्या महात्मा जोतिबा फुले सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
मैफलीची सुरुवात गायक-वादक लोमहर्ष भगत आणि सुजित पाटील यांनी गिटारसोबत ‘मिठाला जागलेलु’ हे गीत दिबांना अर्पण करून केली. त्यानंतर, ‘ब आणि बा’ ही आई आणि बाबांचे महत्त्व सांगणारी कविता डॉ. अनिल रत्नाकर यांनी सादर केली. आजही शेतकऱ्यांचे हाल तेच आहेत, हे सांगत प्रकाश पाटील यांनी ‘भरोसा’ ही कविता सादर केली. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता आणि आताच बीजेपीच्या काळात कालपरवा नेवाळी येथे शेतकऱ्यांवर पॅलेटगनचा वापर करण्यात आला. सरकारला शेतकरी आतंकवादी वाटत आहे का, असा सणसणीत सवाल करत ‘नेवाळी-एक इशारा’ ही आगरी बोलीतील कविता ज्ञानेश्वर चिकणे यांनी सादर केली.
दिबांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. त्यांनी १०० हून अधिक शाळा काढल्या. याचाच दाखला देत, शिक्षणाचे महत्त्व पटवत ‘डावा डोला लवला’ ही कविता गजानन पाटील यांनी सादर केली. शेतकऱ्यांसाठी झटणारा ‘शेतकऱ्यांचा बा’ ही कविता सर्वेश तरे यांनी सादर केली. नगरसेविका रंजना केणी यांनी ‘जमीन’ ही कविता सादर करत भूमिपुत्रांच्या व्यथा मांडल्या. दि.बा. पाटलांच्या स्मृती जागवण्यासाठी खास विजय गायकर आणि सर्वेश तरेंनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. प्रस्तुत कार्यक्र मास दिबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे पुत्र आणि कन्या अतुल पाटील, अंजली भगत उपस्थित होते.