उल्हासनगरात रंगला काव्योत्सव, ३५ कविंचा सहभाग
By सदानंद नाईक | Published: February 26, 2024 08:06 PM2024-02-26T20:06:30+5:302024-02-26T20:06:46+5:30
उल्हासनगरातील कालिका कला मंडळाने अमृत महोत्सवात पर्दापण केले असून त्यानिमित्त संस्थेने काव्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी संस्थेच्या सभागृहात केले.
उल्हासनगर: शहरातील श्री कालिका कला मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवारी कविता - गझलांचा देखणा काव्योत्सव कार्यक्रम साजरा झाला. संस्थेने आयोजित केलेल्या काव्यवाचन स्पर्धेतील निमंत्रितांच्या संमेलनातील कवी कवयित्री अशा एकूण ३५ कविंनी ह्या काव्यसोहळ्यात भाग घेतला आहे.
उल्हासनगरातील कालिका कला मंडळाने अमृत महोत्सवात पर्दापण केले असून त्यानिमित्त संस्थेने काव्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी संस्थेच्या सभागृहात केले. ज्येष्ठ कवी गीतकार अरुण म्हात्रे, गझलकार प्रशांत वैद्य, पत्रकार माधव डोळे, डॉ. नरसिंग इंगळे, भरत भानुशाली, विजय जाधव, नंदा कोकाटे, मीनाक्षी ठाकरे आदींनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमात प्रेम कविता, देशप्रेमाच्या कविता, मराठीभाषा गौरवाच्या कविता आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या गझला आदींचा भरपूर आनंद रसिकांना मिळाला. ह्या प्रसंगी बोलताना कवी अरुण म्हात्रे यांनी उल्हासनगरमधील काव्य रसिकांचे कौतुक केले आणि कवितेतून मनातील ताणेबाणे आणि समाज वास्तव यातील सुप्त खाचाखोचा याचे दर्शन घडते, असे उदगार काढले.
शहरातील कालिका कला मंडळाने आयोजित केलेल्या काव्यउत्सव स्पर्धेत नवीन एकूण २३ कवींना स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळाली. स्पर्धेत प्रथम क्रमांक किशोर पवार-वसई, द्वितीय क्रमांक- सौ.वैशाली भागवत- बडोदे, तृतीय क्रमांक- सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर. तर उत्तेजनार्थ म्हणून सौ. स्मिता शिंदे, सुधाकर कांबळे, आणि सौ.दीप्ती चाफेकर यांनी पारितोषिक पटकावले. परीक्षक म्हणून कवी अरूण म्हात्रे आणि पत्रकार कवी माधव डोळे यांनी काम पहिले. कविता लेखन स्पर्धेत एकुण ५७ कवींनी भाग घेतला होता. त्यातील २५ कवींच्या कवितांची निवड डॉ.ज्योतीेे कदम- नांदेड, प्रा.बाळासाहेब लबडे व गझलकार माधव डोळे यांनी केली होती.