केडीएमसीचे ११ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत
By Admin | Published: July 16, 2015 11:04 PM2015-07-16T23:04:18+5:302015-07-16T23:04:18+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळ सभापतींसह सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने आणि विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर वचक नसल्याने यंदाही ७४ शाळांमधील
- अनिकेत घमंडी, डोंबिवली
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळ सभापतींसह सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने आणि विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर वचक नसल्याने यंदाही ७४ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच महिन्यात शैक्षणिक साहित्य मिळाले तर नाहीच, उलट त्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महापालिकेच्या शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या असून अद्यापही साहित्य मिळालेले नाही. वेळच्या वेळी शैक्षणिक साहित्य मिळावे, यासाठी मंडळाच्या माध्यमातून त्यासंदर्भातील निविदांनाही ३० एप्रिलच्या सभेत मंजुरी देण्यात आली. तरीही मे महिना उलटण्याआधी दोन दिवस टेंडर काढल्याने प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर ही नामुष्की येणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. सभापतींवर अविश्वासाचा ठराव आणावा, अशी मागणी मंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य धनंजय कांबळे यांनी केली होती. प्रशासन काही ना काही कारणे सांगून चालढकल करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला सर्वस्वी सभापती शांताराम पवार जबाबदार असल्याचा आरोप आहे.
प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांवर ही वेळ आली आहे. त्यांना लवकरात लवकर ते साहित्य देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षण मंडळ सदस्य शशिकांत कांबळे यांनी सांगितले.
आगामी १० दिवसांत विद्यार्थ्यांना रेनकोट तसेच १५ दिवसांत वह्या मिळण्याची शक्यता आहे. गणवेशासाठी मात्र महिना-दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- सुरेश आवारी, प्रशासन अधिकारी,
केडीएमसी शिक्षण मंडळ