KDMCतील 'या' 52 सोसायट्यांचा लोकसभा-विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 02:08 PM2019-02-04T14:08:44+5:302019-02-04T14:52:21+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे शास्त्रोक्त भरावभूमी कचरा प्रकल्पास बारावे परिसरातील जवळपास 52 सोसायट्यांमधील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. हा प्रकल्प नागरी वस्तीलगत राबवू नये. प्रकल्प राबविल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे शास्त्रोक्त भरावभूमी कचरा प्रकल्पास बारावे परिसरातील जवळपास 52 सोसायट्यांमधील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. हा प्रकल्प नागरी वस्तीलगत राबवू नये. प्रकल्प राबविल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. शिवाय, महापालिकेविरोधात 5 फेब्रुवारीला मोर्चादेखील काढला जाणार आहे.
प्रकल्पास नागरिकांचा विरोध का आहे? याची माहिती घेण्यासाठी रोझाली सोसायटीमध्ये सोमवारी(4 फेब्रुवारी) बारावे हिलरोड सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बारावे परिसरात 52 रहिवासी सोसायट्या आहेत. या सोसायट्यात राहणाऱ्या फ्लॅट धारकांची संख्या 7 हजारांपेक्षा जास्त आहे. या परिसरात जवळपास 25 हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती वास्तव्य करुन आहे. नागरी लोकवस्तीजवळ कचरा प्रकल्प नसावा, असा नियम आहे.
हा प्रकल्प नागरी वस्तीच्या लगत केला जात आहे. या ठिकाणी प्रकल्प राबवण्याचा मानस महापालिकेचा होता. त्याठिकाणी महापालिकेच्या नगररचना विभागाने इमारती उभारण्यासाठी परवानगी का दिली?असा सवाल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.