बेकायदा इमारतीवर केडीएमसीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:45 AM2021-08-14T04:45:56+5:302021-08-14T04:45:56+5:30
कल्याण : दावडी येथील तुकाराम चौकात राम अवतार यादव यांनी तीन मजली बेकायदा इमारतीचे बांधकाम केले होते. या बेकायदा ...
कल्याण : दावडी येथील तुकाराम चौकात राम अवतार यादव यांनी तीन मजली बेकायदा इमारतीचे बांधकाम केले होते. या बेकायदा इमारतीची तक्रार वास्तूविशारद संदीप पाटील यांनी केली होती. त्याआधारे प्रभाग अधिकाऱ्यांनी या इमारतीवर शुक्रवारी हातोडा चालविला आहे.
महापालिका कर्मचारी व पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी महापालिकेने थातूरमातूर कारवाई केल्याचा दिखावा केला होता. मात्र, शुक्रवारी थेट कारवाई करण्यात आली. डीपी रस्त्यात बेकायदा इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्यावर कारवाई केल्यास रस्ते विकसित करण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पात रस्त्याआड येणाऱ्या बेकायदा इमारती पाडणे गरजेचे आहे. अशाच प्रकारे रस्त्याच्या आड येणाऱ्या बेकायदा इमारती पाडण्याची मोहीम मनपाने अधिक गतीने राबविली पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, ई प्रभागातील नांदिवली टेकडी येथील ११ बेकायदा शेड आणि दोन टपऱ्या, एक फुटींगचे बांधकाम पाडण्याची कारवाई केली. ही कारवाई प्रभाग अधिकारी भरत पवार यांनी केली आहे.
----------------------