केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांना अटक, आठ लाखांची लाच घेताना कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 06:48 AM2018-06-14T06:48:45+5:302018-06-14T06:48:45+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत (५१) यांच्यासह दोघा लिपिकांना बुधवारी आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत (५१) यांच्यासह दोघा लिपिकांना बुधवारी आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. लाचखोरी प्रकरणात महापालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याविरोधात ही कारवाई झाली आहे.
सात मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी घरत यांच्यासह ललित आमरे (४२) आणि भूषण पाटील (२७) या दोघा लिपिकांनी तक्रारदाराकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती ३५ लाख देण्याचे ठरले. त्यापैकी आठ लाखांचा पहिला हप्ता बुधवारी दुपारी ३ वाजता पालिका कार्यालयात स्वीकारताना त्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तिघांनाही गुरुवारी कल्याण न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली.
घरत यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी महासभेने निलंबनाचा ठराव मंजूर केला होता. मात्र, त्यांच्यावर कारवाईस टाळाटाळ केली जात होती. घरत हे पालिकेचे अधिकारी की सरकारचे तसेच महासभेचा ठराव हा शासकीय की अशासकीय, या कचाट्यात हा मुद्दा अडकला होता. मात्र, राज्य सरकारने घरत पालिकेचे अधिकारी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाईची जबाबदारी आयुक्तांवर होती. परंतु, ती झालेली नव्हती.
दरम्यान, लाचलुचपत विभागाने घरत यांच्या दोन गाड्यांची कसून झडती घेतली. त्याचबरोबर त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले.
राज्यमंत्र्यांशी जवळीक
घरत यांची मंत्रालयापर्यंत ‘पोच’ असल्याची चर्चा नेहमी पालिका वर्तुळात रंगत असे. एका राज्यमंत्र्यांच्या ते जवळचे असल्याचे मानले जात. असे असतानाही त्यांच्यावर कारवाई झाल्याने महापालिका वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
२३ वर्षांत ३१ लाचखोर केडीएमसीच्या १९९५च्या लोकप्रतिनिधी राजवटीपासून आजपर्यंत २३ वर्षांच्या कालावधीत ३१ लाचखोर अधिकारी, कर्मचारी तर दोन आजी-माजी नगरसेवकांना लाच प्रकरणात अटक झाली आहे.
कल्पेश जोशी यांनी वाटले पेढे
डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींवर कारवाई करावी, या मागणीसाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ११ दिवसांपासून कल्पेश जोशी यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, संबंधित अधिकारी त्यांना दाद देत नव्हते. घरत यांना लाच घेताना पकडल्याचे जोशी यांना समजताच त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
भ्रष्ट अधिकाºयांवर कारवाईची मागणी
घरत यांच्याविरोधात वारंवार तक्रारी केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेसुद्धा त्यांची तक्रार केली होती. त्याबद्दल घरत यांना वारंवार समजही देण्यात आली होती. मात्र, हे अधिकारी इतके निर्ढावले आहेत की, भ्रष्टाचार कमी करायचा सोडून उलट अजून भ्रष्टाचाराला गती देत बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत आहेत. अशा अधिकाºयांवर कडक कारवाईची मागणी फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.