केडीएमसी प्रशासन धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:21 AM2017-08-05T02:21:06+5:302017-08-05T02:21:06+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला.
कल्याण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला. नियोजन आणि सुविधांअभावी गणेशभक्तांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले. यावर तातडीने नियोजनाच्या दृष्टीने तयारी करावी, सदस्यांच्या सूचना कागदावरच न ठेवता त्याबाबत कृती व्हावी, असे आदेश सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.
गणेशोत्सव जवळ आल्याने महापालिकेने कोणते नियोजन केले आहे, असा सवाल सभा सुरू होण्यापूर्वी भाजपा सदस्य विकास म्हात्रे यांनी केला. मागील वर्षी आपल्या प्रभागातील गणेशघाटावर कोणत्याही सुविधा नव्हत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. गणेशमूर्ती विसर्जन करणारी चार मुले वाहून गेली होती. परंतु, त्यांना पोहता येत असल्याने त्यांचा जीव वाचला. तेथे बोटींची व्यवस्थाही महापालिकेने केलेली नव्हती, तसेच अग्निशमन दलाचे जवानही कोणतीही साधने नसल्याने नुसते बघ्याची भूमिका घेत होते, असेही म्हात्रे म्हणाले.
यावर सभापती रमेश म्हात्रे यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी सुधाकर कुलकर्णी यांना विचारणा करताच त्यांनी मागील वर्षी ५२ ठिकाणच्या विसर्जनस्थळी अग्निशमन दलाचे जवान नेमले होते. परंतु, मनुष्यबळाअभावी सर्वच ठिकाणी कर्मचारी देणे शक्य झाले नाही. यंदा १०० स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार आहे, तसेच अस्तित्वात असलेल्या बोटींव्यतिरिक्त आणखी चार बोटी घेतल्याने या वेळेस गैरसोय होणार नाही, असे त्यांनी सांगितले. या स्वयंसेवकांची माहिती नाव आणि फोटोसह द्या, अशा सूचना सभापती म्हात्रे यांनी या वेळी महापालिका प्रशासनाला केल्या.