‘केडीएमसी’ला हरित लवादाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:49 AM2017-08-19T02:49:50+5:302017-08-19T02:49:54+5:30
एमआयडीसीतील आजदे तलावाच्या प्रदूषणासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने केडीएमसीला दिले आहेत.
डोंबिवली : एमआयडीसीतील आजदे तलावाच्या प्रदूषणासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने केडीएमसीला दिले आहेत. लवादाचा हा आदेश राज्यातील सगळ्याच महापालिकांना मार्गदर्शक ठरणारा आहे.
आजदे तलावात गणपती व देवीच्या मूर्ती विसर्जित केल्याने तलाव प्रदूषित होतो, म्हणून डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने हरकत घेतली होती. हा तलाव नैसर्गिक पाझर तलाव आहे. त्याचे पाणी प्रदूषित झाल्याने त्यातील मासे, कासवे मरण पावली आहे. स्थानिक नागरिक राजू नलावडे यांनी प्रदूषण मंडळ व एमआयडीसीकडे पाठपुरावा केला होता. २०१६ च्या गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात तसेच २०१७ सालच्या जानेवारीत माघी गणेशोत्सवात सुमारे हजार गणेशमूर्ती विसर्जित केल्याची तक्रार करण्यात आली होती. तलाव किती प्रदूषित झाला आहे, याची तपासणी केली असता तलावाच्या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण शून्य आढळले होते. या अहवालानंतरही प्रदूषण मंडळाने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. या पाठपुराव्यानंतर असोसिएशनने हरित लवादाकडे याचिका दाखल केली गेली. या याचिकेवर ११ आॅगस्टला सुनावणी झाली. मूर्तीचे विसर्जन कशा प्रकारे करावे, यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यानुसार, या तलावात मूर्तींचे विसर्जन करू नये व पालिकेने विसर्जनाची पर्यायी व्यवस्था करावी. कृत्रिम तलावाची निर्मिती करावी. मूर्ती विसर्जनानंतर गाळ, निर्माल्य काढावेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने विसर्जनापूर्वी, विसर्जनाच्या वेळी आणि विसर्जनानंतर पाण्याचे नमुने घ्यावेत. या पाण्यातील बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड, केमिकल आॅक्सिजन डिमांड, टोटल सॉलिड अॅण्ड मेटल अर्थात क्रोमाइम, लीड, झिंक, कॉपर यांचे प्रमाण तपासावे. त्याचे निष्कर्ष वेबसाइटवर टाकवेत. लवादाच्या आदेशाची अवहेलना होणार नाही, यासाठी सहकार्य करण्याची मागणी असोसिएशनच्या पदाधिकारी वर्षा महाडिक, अर्चना पाटणकर, रश्मी येवलेयांनी आयुक्त पी. वेलारासू यांच्याकडे केली आहे. महापालिका हद्दीत सात तलाव आहेत. या सगळ्याच तलावांत विसर्जन होत नाही. कल्याण पूर्वेला कृत्रिम विसर्जन तलाव तयार केला जातो. डोंबिवलीत रोटरी क्लबतर्फे कृत्रिम तलाव तयार केला जातो. दरम्यान लवादाच्या आदेशाचे पालिका कितपत पालन करते व त्यांच्याकडून पालन झाले नाही, तर लवाद पालिकेवर काय कारवाई करतो, याकडे असोसिएशनचे लक्ष लागले आहे.