केडीएमसीत सामान्य नागरिकांना दुपारी तीननंतरच मिळणार प्रवेश
By admin | Published: January 7, 2016 12:35 AM2016-01-07T00:35:39+5:302016-01-07T00:35:39+5:30
नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे निराकरण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून न झाल्यास आपल्याला भेटा, असा फतवा आयुक्त
कल्याण : नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे निराकरण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून न झाल्यास आपल्याला भेटा, असा फतवा आयुक्त ई. रवींद्रन यांनी नुकताच जारी केला असताना आता यात आणखीन एका फतव्याची भर पडली आहे. यानुसार, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना भेटायचे असल्यास नागरिकांना दुपारी ३ नंतरच मुख्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. एकीकडे समस्यांचे निराकरण वेळेवर होत नसल्याची तक्रार असताना दुसरीकडे अशा प्रकारचे वेळेचे बंधन घातले गेल्याने नागरिकांच्या नाराजीत अधिकच भर पडली आहे.
मुख्यालयात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत असल्याने बऱ्याचदा अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय येतो. त्यामुळे दैनंदिन कामकाज करण्यास त्यांना अडथळा निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. राज्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या मंत्रालय इमारतीतील प्रवेशाचे ज्या प्रकारे नियमन केले आहे, त्या धर्तीवर केडीएमसी मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत प्रवेश देण्याबाबत नियमन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने वेळेचे हे नियमन केल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिकेच्या सेवेत असलेले अधिकारी आणि कर्मचारी, सर्व पदाधिकारी, महापालिका सदस्य तसेच अन्य लोकप्रतिनिधी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी येणारे शासकीय, अशासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांना महापालिकेत कधीही येण्याची मुभा असेल. परंतु, वैयक्तिक कामासाठी त्यांना सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांना दुपारी ३ वाजल्यानंतरच भेटता येईल, असेही जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. हे आदेश १ जानेवारीपासून लागू केले असले तरी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने मात्र बुधवारी याबाबतचे पत्रक जारी केले आहे. (प्रतिनिधी)