केडीएमसीचे आयुक्त शिवसेनाधार्जिणे
By admin | Published: January 12, 2017 07:10 AM2017-01-12T07:10:48+5:302017-01-12T07:10:48+5:30
पूर्वेतील विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त
कल्याण : पूर्वेतील विविध समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त ई. रवींद्रन दाद देत नसल्याने महापालिका प्रशासनाविरोधात बुधवारपासून कल्याण पूर्वेचे भाजपासमर्थक आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. महापालिका आयुक्त हे शिवसेनेचे आहेत. त्यांना शहराच्या इतर समस्या व विकासकामांशी काही देणेघेणे नाही. ते शिवसेनेच्या तालावर नाचणारे आहेत, असा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.
शिवाजी चौकात ते उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम, शिवसेनेचे संजय मोरे यांनी समर्थन दिले आहे. कल्याण पूर्वेतील स्कायवॉकचे काम पूर्ण झालेले असताना तो नागरिक व प्रवाशांसाठी खुला केला जात नाही. शिवसेनेला त्यांच्या नेत्यांच्या हस्ते तो खुला करायचा आहे. त्यासाठी शिवसेना नागरिक व प्रवाशांना का वेठीस धरीत आहे, असा सवाल गायकवाड यांनी केला आहे.
कल्याण-हाजीमलंग रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या रस्त्याची निविदा काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी एका मर्जीतील कंत्राटदाराला काम मिळावे, यासाठी या रस्त्याच्या कंत्राटाची निविदा दाबून ठेवली. फेब्रुवारीमध्ये मलंगगडची यात्रा आहे. गडाकडे जाण्यासाठी कल्याण-मलंगगड हाच एकमेव रस्ता असल्याचे ते म्हणाले.
दादासाहेब क्रीडांगणात प्रेक्षक गॅलरी तयार करण्याचे काम ज्या कंत्राटदाराला दिले आहे, त्याला कामांची ३० टक्के रक्कम दिली आहे. कंत्राटदाराने १० टक्केही काम केले नाही. त्याला कामाची रक्कम कशाच्या आधारे दिली, असा प्रश्न गायकवाड यांनी केला आहे. त्याचबरोबर आशेळेगाव व पाडा हा परिसर २७ गावांमध्ये आहे. ही२७ गावे १ जून २०१५ पासून महापालिकेत आहेत. आशेळे गाव व पाड्यात पाणीटंचाई आहे. तेथे गायकवाड यांनी स्वखर्चात जलवाहिनी टाकली. महापालिकेने कारवाईच्या वेळी ही जलवाहिनी तोडली. त्यामुळे तेथे पाणीसमस्या नागरिकांना भेडसावत आहे. कल्याण ते चक्कीनाका रस्ता रुंदीकरणात विठ्ठलवाडी स्थानकानजीकच्या झोपडीधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यास दीड वर्ष उलटून गेले, तरी त्यांना पर्यायी जागा वा पुनर्वसन केलेले नाही. या विविध प्रश्नांवर कोणताही तोडगा काढण्यात आयुक्त असमर्थ ठरले. त्यामुळे त्यांच्याविरोधात बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसल्याचे गायकवाड म्हणाले.
गायकवाड यांनी यापूर्वी महापालिका मुख्यालयासमोर अशाच प्रकारचे बेमुदत उपोषण सुरू केले होते. तेव्हा तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. बुधवारी गायकवाड यांनी त्याची आठवण सांगत सोनवणे यांनी कामे केली होती, असे सांगितले.