फेरीवाल्यांविरोधात केडीएमसी आयुक्त उतरले रस्त्यावर; कल्याणमध्ये कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 12:05 AM2019-11-01T00:05:36+5:302019-11-01T00:05:53+5:30
माल जप्त, विक्रेत्यांची पळापळ
कल्याण : केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई होत नसल्याने राज्यमंत्री व नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना जमत नसेल तर बदली करून घ्यावी, असा सल्ला दिला होता. त्यानंतर गुरुवारी बोडके यांनी स्वत: रस्त्यावर उतरून कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई केली. त्यामुळे फेरीवाल्यांची पळापळ झाली. कारवाई पथकाने फेरीवाल्यांचा एक ट्रकभर माल जप्त केला. या कारवाईत सातत्य ठेवणार असल्याचे बोडके यांनी स्पष्ट केले.
डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. महापालिका अधिकाऱ्यांचे फेरीवाल्यांसोबत आर्थिक संबंध असल्याची टीका चव्हाण यांनी केली होती. तसेच बोडके यांना खरमरीत पत्र लिहून जमत नसेल तर बदली करून घ्या, असा सल्लाही दिला. त्यामुळे बोडके यांनी गुरुवारी स्वत: कारवाईसाठी पुढाकार घेतला.
बोडके यांनी ‘क’ प्रभाग अधिकारी भरत पवार आणि ‘ब’ प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांना अतिक्रमण पथकासह महापालिका मुख्यालयात बोलावून घेतले. मुख्यालयासमोरील दुकानांबाहेर लावलेल्या वस्तू जप्त केल्या. दुकानदार आणि कर्मचारी यांच्यात झटापट झाली. त्यानंतर कारवाई पथक शिवाजी चौक ते महंमद अली चौकादरम्यान पोहचले. पुष्पराज हॉटेल ते दीपक हॉटेलदरम्यान रस्त्यालगतच्या दुकानाबाहेर आलेले पत्रेही तोडण्यात आले. या कारवाईमुळे फेरीवाल्यांमध्ये एकच पळापळ झाली.
कर्मचाऱ्यांअभावी कारवाई थंडावली होती
कारवाई संदर्भात बोडके म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेचे कर्मचारी घेण्यात आले होता. त्यामुळे महिनाभराच्या काळात कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले होते. निवडणूक संपताच आता कारवाईस सुरुवात केली आहे. दरम्यान, आमदारांनी पत्र दिले म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरलात का, असा प्रश्न आयुक्तांना विचारला असता त्याविषयी बोलणे टाळले.
डोंबिवलीत बुधवारी रात्री कारवाई : केडीएमसीचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी बुधवारी रात्री डोंबिवली स्टेशन परिसरात ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग अधिकाºयांना घेऊन ४८ फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. तसेच दोन जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.