केडीएमसीतील समित्यांचे सभापती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:35 AM2019-06-11T01:35:39+5:302019-06-11T01:36:01+5:30

उद्या होणार शिक्कामोर्तब : परिवहन, शिक्षणसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल

KDMC Committees are elected unanimously | केडीएमसीतील समित्यांचे सभापती बिनविरोध

केडीएमसीतील समित्यांचे सभापती बिनविरोध

Next

कल्याण : केडीएमसीच्या परिवहन, शिक्षण आणि १० प्रभाग समिती सभापतीपदांची निवडणूक बुधवारी होत आहे. परंतु, सोमवारी या समित्यांसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने समित्यांच्या सभापतीपदावर संबंधितांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी निवडणुकीच्या दिवशी होणार आहे.

परिवहन समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचे मनोज चौधरी आणि शिक्षण समिती सभापतीपदासाठी सेनेच्याच नमिता पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. मागील वेळेस दोन्ही सभापती भाजपाचे निवडून आले होते. यंदा टर्म शिवसेनेची असल्याने युतीचे सभापती म्हणून चौधरी आणि पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. परिवहन समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे आणि भाजपाचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो आणि हे पद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे सेनेचे सध्या सात सदस्य समितीत आहेत. १३ सदस्य असलेल्या समितीमध्ये मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव, सुनील खारूक, अनिल पिंगळे, बंडू पाटील हे सेनेचे सदस्य सभापतीपदासाठी इच्छुक होते. परंतु, उमेदवारीची माळ अखेर मनोज चौधरी यांच्या गळ्यात पडली आहे.
शिक्षण समितीमध्ये पक्षीय बलाबलानुसार शिवसेना ५, भाजप ४, मनसे आणि काँग्रेस प्रत्येकी १ अशी स्थिती आहे. यंदा शिवसेनेची टर्म असल्याने नमिता पाटील, माधुरी काळे, छाया वाघमारे, भारती मोरे या सेनेच्या महिला सदस्यांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत होती. अखेर, सभापतीपदाचे उमेदवार म्हणून नमिता पाटील यांची वर्णी लागली आहे. महापालिका सचिव संजय जाधव यांच्याकडे सोमवारी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत अर्ज दाखल करावयाचे होते. परंतु, सायंकाळी ५ वाजता शिवसेनेतर्फे परिवहन, शिक्षण तर १० प्रभागांपैकी सात समित्यांचे अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर विनीता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सभागृहनेते श्रेयस समेळ, रमेश जाधव, विश्वनाथ राणे, मल्लेश शेट्टी, राजेश मोरे या नगरसेवकांसह परिवहनचे आजीमाजी सदस्य आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रभागांचे सभापतीही बिनविरोध
‘अ प्रभागात दयाशंकर शेट्टी, ‘ब’ प्रभागामध्ये नीलिमा पाटील, ‘ड’ प्रभागात राजवंती मढवी,‘ग’ मध्ये दीपाली पाटील,‘ई’ प्रभागात रूपाली म्हात्रे, ‘आय’मध्ये विमल भोईर (सर्व शिवसेना), ‘क’ मध्ये शकीला खान (शिवसेना सहयोगी अपक्ष), यांच्यासह ‘जे’ प्रभाग गणेश भाने, ‘फ’ प्रभाग विश्वदीप पवार आणि ‘ह’ प्रभागात वृषाली जोशी या भाजप सदस्यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या दहाही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदावरही संबंधितांची बिनविरोध निवड झाली आहे. याची अधिकृत घोषणाही बुधवारीच होईल, अशी माहिती सचिव जाधव यांनी दिली.

Web Title: KDMC Committees are elected unanimously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.