केडीएमसीतील विकासकामे का थांबली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:03 AM2018-05-04T02:03:27+5:302018-05-04T02:03:27+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सुरू असलेली विकासकामे कुठपर्यंत आली आणि ती का थांबली आहेत, असा सवाल करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी महापालिका
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सुरू असलेली विकासकामे कुठपर्यंत आली आणि ती का थांबली आहेत, असा सवाल करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. वेळेत कामे होत नसल्याने संबंधित अधिकाºयांवर कारवाई करा, असे आदेशही त्यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना दिले. घनकचरा प्रकल्पासंदर्भात सरकारने निधी दिला आहे. इतरांनी कोणी श्रेय घेऊ नये, अशा शब्दांत चव्हाण यांनी अप्रत्यक्षरीत्या का होईना, शिवसेनेलाही यावेळी टोला लगावला.
केडीएमसीतील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी चव्हाण यांनी गुरुवारी मंत्रालयात विशेष बैठक घेतली. ही बैठक तीन तास चालली. याप्रसंगी उपमहापौर मोरेश्वर भोईर, स्थायी समिती सभापती राहुल दामले, भाजपा गटनेते वरुण पाटील, भाजपा पदाधिकारी व नगरसेवक, आयुक्त गोविंद बोडके, अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केवळ चर्चेसाठी ही बैठक नाही, तर रखडलेली विकासकामे लवकरात लवकर मार्गी लागावी, या उद्देशाने ही बैठक बोलावल्याचे चव्हाण यांनी सुरुवातीला स्पष्ट केले. महापालिका हद्दीतील नागरिकांना नागरी सुविधा प्रथम उपलब्ध झाल्या पाहिजेत. महापालिका अधिकाºयांकडून विकासकामे करण्यासाठी किती वेळ लागेल, हे जाणून घेऊन त्यासाठी लागणारा कालावधी चव्हाण यांनी नोंदवून घेतला. रखडलेल्या प्रकल्पांबाबत यावेळी अधिकाºयांना फैलावर घेण्यात आले. कामचुकार अधिकाºयांवर कारवाई करा, असे आदेशही बोडके यांना दिले. अधिकाºयांपेक्षा जास्त कामे प्रत्येक प्रभागातील नगरसेवक करतात, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. अर्थसंकल्पात आमची कामे होत नाहीत, केवळ शिवसेनेची कामे होतात, असा आरोप नगरसेवक विकास म्हात्रे यांनी केला. त्याचा समाचारही चव्हाण यांनी घेतला.
महापालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयांमधील सोयीसुविधांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. डोंबिवलीतील सूतिकागृह बंद असल्याने गर्भवती महिलांची परवड होत आहे. ती थांबवण्यासाठी दोन वर्षांत हे सूतिकागृह नव्याने बांधून सुरू करा. सरकार त्यासाठी निधी देईल, असे चव्हाण म्हणाले.
वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पाची सद्य:स्थितीही त्यांनी जाणून घेतली. अधिकारी ज्या कामात सार्वजनिक हित आहे, त्यात टाळाटाळ करतात, पण बाकी इतर कामे बरोबर करतात, असा टोला चव्हाण यांनी लगावला. नर्सिंग महाविद्यालय उभारले गेले पाहिजे. त्यामुळे रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. शास्त्रीनगर रुग्णालयातही शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे, अशा सूचनाही करण्यात आल्या.