केडीएमसी निवडणुकीची अनिश्चितता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:48+5:302021-03-05T04:40:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केडीएमसीची निवडणूक होणार कधी? याबाबतची अनिश्चितता कायम आहे. आरक्षणप्रक्रियाही पार पडलेली नाही. ...

KDMC election uncertainty persists | केडीएमसी निवडणुकीची अनिश्चितता कायम

केडीएमसी निवडणुकीची अनिश्चितता कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केडीएमसीची निवडणूक होणार कधी? याबाबतची अनिश्चितता कायम आहे. आरक्षणप्रक्रियाही पार पडलेली नाही. त्यात निवडणूक ११८ प्रभागांमध्ये होणार की १२२ याचाही निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले हवशे गवशे आणि नवशे दिशाहीन झाल्याचे चित्र आहे.

केडीएमसीची निवडणूक गेल्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक होऊ शकलेली नाही. नोव्हेंबरपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होईल, अशी आशा होती. दुसरीकडे राज्य सरकारने मनपा हद्दीतील १८ गावे वगळल्याने निवडणूक आयोगाने नवीन प्रभागरचनेच्या कामाला सुरुवात करून ते पूर्णही केले होते. परंतु, १८ गावे वगळण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने डिसेंबरमध्ये रद्दबातल ठरवल्याने निवडणूक २०१५ च्या प्रभाग रचनेनुसार होतील, हे स्पष्ट झाले. यात जानेवारीत आरक्षणप्रक्रिया पार पडणार होती. प्रभागाची रचना कायम राहिल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला होता.

परंतु, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मनपाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर एकूणच या प्रक्रियेला खीळ बसली आहे. निवडणूक जर पूर्वीच्या १२२ प्रभागांमध्ये झाली तर तेथे कोणते आरक्षण पडेल आणि जर निवडणूक ११८ प्रभागांत झाली तर प्रभागाच्या रचनेत नव्याने कोणते बदल झाले असतील, कोणते आरक्षण पडेल, त्यात आपल्यासाठी प्रभाग सोयीचा ठरेल का, या चिंतेने निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी दोन नव्हे, तर चार दगडांवर पाय ठेवल्याची चर्चा सध्या जोमाने सुरू आहे.

१२ मार्चच्या सुनावणीकडे लक्ष

मनपाने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर १२ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यावेळी केवळ सुनावणी होते की निर्णय दिला जातो, याकडे प्रशासनासह इच्छुकांचे लक्ष लागले आहे. मे अथवा जूनमध्ये निवडणूक होईल, असा अंदाज व्यक्त होत असताना पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने निवडणूक अजून लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

------------------------------------------------------

Web Title: KDMC election uncertainty persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.