नऊ गावांसह होणार केडीएमसीची निवडणूक; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:29 AM2020-07-04T00:29:35+5:302020-07-04T00:29:46+5:30

११६ ते ११८ प्रभागांची होणार निर्मिती

KDMC elections to be held with nine villages; Notification issued by the State Government | नऊ गावांसह होणार केडीएमसीची निवडणूक; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

नऊ गावांसह होणार केडीएमसीची निवडणूक; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

Next

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. त्यामुळे केडीएमसीची पुढील निवडणूक नऊ गावांसह होणार आहे. या गावांच्या समावेशामुळे मनपाच्या बदललेल्या सुधारित हद्दीसह अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे.

निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आधीच दिले आहेत. या दोन्ही अधिसूचनांनंतर प्रभागांची नव्याने होणारी रचना, आरक्षण सोडत प्रक्रियेसह निवडणुकीची प्रत्यक्ष तारीख आयोग कधी घोषित करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

२७ गावांमधील १८ गावे वगळण्याबाबत आणि नऊ गावे महापालिकेत ठेवण्यात येत असल्याची घोषणा सरकाने १४ मार्चच्या विधिमंडळ अधिवेशनात झाली होती. तर, वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद असेल, अशी अधिसूचना २४ जूनला काढली आहे. तर, उर्वरित नऊ गावांचा समावेश असलेल्या केडीएमसीच्या सुधारित हद्दीची अधिसूचना महापालिकेला सरकारकडून शुक्रवारी प्राप्त झाली. त्यामुळे २७ गावांची वेगळी नगरपालिका झालीच पाहिजे, अशी सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी असली तरी आजदे, सागाव, नांदिवली, पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर, देसलेपाडा या महापालिकेत राहिलेल्या नऊ गावांसह केडीएमसीची निवडणूक होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या बदलामुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील. यातील प्रभागांमधील लोकसंख्या साधारण साडेअकरा हजारांच्या आसपास राहील, असे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेची सुधारित हद्द
उत्तरेस उल्हास नदीचा दक्षिणेकडील काठ, भातसा (काळू) नदीचा दक्षिणेकडील काठ, उंबर्डे, कोळिवली, गंधारे, बारावे, अटाळी, आंबिवली, बल्याणी, मांडा, टिटवाळा, चोळे, ठाकुर्ली या गावांची उत्तरेकडील हद्द.

पूर्वेस टिटवाळ्याच्या पूर्व व दक्षिण हद्दीने मांडाच्या दक्षिण हद्दीपर्यंत. मांडाच्या पूर्व-दक्षिण हद्दीने, बल्याणीच्या पूर्व-दक्षिण हद्दीपर्यंत. उंभार्णीच्या पूर्व हद्दीने, मोहिलीच्या पूर्व-दक्षिण हद्दीपर्यंत. वालधुनी नदीच्या काठाने, गाळेगाव, मोहने, वडवली गावांच्या दक्षिणेकडील हद्दी तसेच शहाडची दक्षिण-पूर्व हद्दीपर्यंत पुढे खडेगोळवलीपर्यंत. दक्षिणेस खडेगोळवली, काटेमानिवली, तिसगाव, नेतिवली या गावांच्या दक्षिण हद्दीने पुढे कल्याण-शीळ रस्त्याने आजदे, सागाव, घारिवली या गावांच्या पूर्वहद्दीने पुढे काटई गावाचे पूर्व व दक्षिण हद्दीने काटई गावच्या पश्चिम हद्दीपर्यंत. पश्चिमेस काटई, उसरघर, संदप, भोपर-देसलेपाडा, या गावांच्या पश्चिम हद्दीने पुढे उल्हास नदीच्या पूर्वकाठाने पुढे कोपर, डोंबिवली (जुनी) या गावांच्या पश्चिम हद्दीने ठाकुर्ली गाव पश्चिम हद्दीपर्यंत.

Web Title: KDMC elections to be held with nine villages; Notification issued by the State Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.