डिझेलच्या बाटल्यांप्रकरणी केडीएमसी दाखल करणार एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:41 AM2021-03-31T04:41:00+5:302021-03-31T04:41:00+5:30

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला शनिवारी पहाटे लागलेल्या आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना डिझेलने भरलेल्या चार ते पाच बाटल्या ...

KDMC to file FIR in diesel bottles case | डिझेलच्या बाटल्यांप्रकरणी केडीएमसी दाखल करणार एफआयआर

डिझेलच्या बाटल्यांप्रकरणी केडीएमसी दाखल करणार एफआयआर

Next

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला शनिवारी पहाटे लागलेल्या आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना डिझेलने भरलेल्या चार ते पाच बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे या डम्पिंग ग्राऊंडला आगी लागत नाही तर लावल्या जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या डिझेल बाटल्यांप्रकरणी केडीएमसीकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यास प्रत्येक उन्हाळ्यात आगी लागतात. त्याचप्रमाणे १६ मार्चला भीषण आग लागली. ही आग पुढे पाच दिवस धुमसतच होती. मोठ्या प्रमाणावर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीसह ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्यापर्यंत पसरले होते. त्यामुळे डम्पिंगला लागून असणारा सीएनजी पंप बंद ठेवण्यात आला होता. या आगीच्या घटनेची देखील केडीएमसीने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात प्रामुख्याने कचरा गोळा करणारे कचरावेचक व त्यांच्याकडून भंगार विकत घेणाऱ्या भंगारवाल्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्यासह सुरक्षा रक्षकांचीही सखोल चौकशी करून कारवाई करावी, याकडेही मनपाने तक्रारीत लक्ष वेधले आहे.

दरम्यान, डम्पिंगवर शनिवारीही आग लागली. मात्र, तेव्हा कोणाच्याही निदर्शनास पडणार नाहीत, अशा छुप्या पद्धतीने त्या बाटल्या कचऱ्याच्या भरावात ठेवल्याचे आढळून आले. या डिझेलच्या बाटल्या कचऱ्याला आग लावण्यासाठी होत्या की चोरीच्या उद्देशाने, असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे डिझेलच्या बाटल्यांचे गूढ उकलले जाते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

------------------

Web Title: KDMC to file FIR in diesel bottles case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.