केडीएमसीला १२ वर्षांनंतर अखेर मिळाले उपसचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:16 AM2019-11-08T00:16:32+5:302019-11-08T00:17:27+5:30
नियुक्तीचे घोडे गंगेत न्हाले : किशोर शेळके यांना आयुक्तांकडून नियुक्तीपत्र
कल्याण : केडीएमसीतील उपसचिवपदासाठी डिसेंबर २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत महापालिकेतील महिला बालकल्याण समिती विभागातील लिपिक किशोर शेळके यांना सर्वाधिक गुण मिळाल्याने ते या पदासाठी पात्र ठरले होते. मात्र, त्यांची उपसचिवपदावर नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रस्तावाला जूनच्या महासभेत मान्यताही दिली होती. परंतु, अखेर चार महिन्यांनी शेळके यांना आयुक्त गोविंद बोडके यांनी नियुक्तीचे पत्रक दिले असून, लवकरच ते या रिक्तपदाचा पदभार घेतील.
केडीएमसीचे सचिव आणि उपसचिवपद २००७ पासून रिक्त आहे. सचिवपदाचा कार्यभार सध्या उद्यान अधीक्षक संजय जाधव हे प्रभारी म्हणून हाताळत आहेत. परंतु, पहिले उपसचिव सुधीर जोशी यांनी २००७ मध्ये घेतलेल्या स्वेच्छानिवृत्तीनंतर हे पद आजतागायत भरलेले नव्हते. २०११ मध्ये उपसचिवपदासाठी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. परंतु, पुढे त्यांचे काय झाले, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. दरम्यान, त्यानंतर पुन्हा प्रशासनाने उपसचिवपद भरण्याबाबत कार्यवाही सुरू केल्याने उपसचिव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
सामान्य प्रशासन विभागाकडून या पदासाठी १८ डिसेंबर २०१६ ला लेखी परीक्षा घेण्यात आली. या पदासाठी एकूण १७ उमेदवारांचे अर्ज आले होते. यातील १४ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यात २०० मार्कांच्या परीक्षेत केडीएमसीचे शेळके यांना सर्वाधिक ११८ गुण मिळाले आहेत. शेळके यांची महापालिकेत २३ वर्षे सेवा झाली आहे. बोडके यांच्या स्वाक्षरीनंतर उपसचिवपद नियुक्तीचा प्रस्ताव जूनमध्ये पार पडलेल्या महासभेत ठेवला गेला होता. त्याला त्यावेळीच महासभेची मान्यता मिळाल्याने शेळके लवकरच उपसचिवपदाचा पदभार स्वीकारतील, असा अंदाज होता. परंतु, आयुक्तांकडून नियुक्तीपत्र देण्यासाठी नोव्हेंबर उजाडला. मधल्या काळात विधानसभा निवडणुकीमुळे हा विलंब झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, चार महिन्यांनी का होईना शेळके यांना उपसचिवपदावर नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले आहे.
सचिवपदही कायमस्वरुपी भरावे
केडीएमसीचे पहिले सचिव चंद्रकांत माने हे डिसेंबर २००७ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर, आतापर्यंत सचिवपद कायमस्वरूपी भरण्यात आलेले नाही. सध्या सचिवपदी संजय जाधव यांची प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे उद्यान अधीक्षकपदाचा पदभारही आहे. उपसचिवपद नियुक्तीनंतर महत्त्वाचे मानले जात असलेले सचिवपद कायमस्वरूपी भरण्याकडे प्रशासनाने लक्ष घालावे, अशीही मागणी आता होत आहे.