KDMC : केडीएमसीच्या सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल झाल्या गहाळ
By मुरलीधर भवार | Published: April 7, 2023 05:58 PM2023-04-07T17:58:27+5:302023-04-07T17:58:49+5:30
KDMC : कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल गहाळ झाल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेमुळे महापालिका मुख्यालयात एकच खळबळ माजली हाेती.
- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील सहाय्यक उपायुक्तांच्या केबीनमधून पाच फाईल गहाळ झाल्याची घटना समाेर आली आहे. या घटनेमुळे महापालिका मुख्यालयात एकच खळबळ माजली हाेती. अखेरीस या फाईल्स दुसऱ्याच विभागात मिळून आल्या आहेत. या प्रकरणी प्रशासनाने शिपायाला निंलबित करण्याची कारवाई केली आहे.
महापालिकेच्या सहाय्यक उपायुक्त इंद्रायनी करचे याच्या दालनातून अभियांत्रिकी कामाच्या पाच फाईल्स गहाळ झाल्या. गहाळ झालेल्या फाईल कुठे गेल्या याची शाेधाशाेध सुरु झाली. फाईल्स सापडत नसल्याने फाईल हाताळणाऱ्या शिपायाला बाेलावून फैलावर घेतले गेले. त्याला ज्या विभागाला फाईल द्यायच्या हाेत्या. त्या दिल्या गेल्या. त्या विभागाकडून त्या फाईल्स कुठे गेल्या याची त्याला माहिती देता आली नाही. प्रशासनाने त्याच शिपायाला निलंबित केले. फाईल बाहेर कशा गेल्या हा प्रश्न प्रशासनाला चक्रावून साेडणारा हाेता. तसेच प्रशासनाचा निष्काळजीपणा यातून उघड झाला.फाईलचा शाेध घेत असताना त्या दुसऱ्याच विभागात आढळून आल्या. त्या विभागात त्या फाईल कशा काय गेल्या. याचे उत्तर प्रशासनालाच मिळालेले नसले. या घटनेमुळे महापालिकेचा भाेंगळ कारभार समाेर आला आहे.
महापालिकेच्या मुख्यालयात सामान्य नागरीकांना अधिकारी वर्गास भेटण्याकरीता दुपारी तीन वाजल्यानंतर साेडले जाते. महापालिका मुख्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यत तर कधी कधी रात्री आठ पर्यंत ठेकेदारांचा राबता असताे. एखादी फाईल या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरवायची असल्यास ती फाईल शिपायाच्या माध्यमातून फिरवली गेली पाहिजे. मात्र काही वेळेस ठेकेदारच या फाईल स्वतः घेऊन विविध विभागात जाताना दिसतात. काही मंडळींकडून त्या फाईलची झेराॅक्स प्रत महापालिकेच्या नजीकच्या झेराॅक्स दुकानातून काढली जाते. हे सगळे प्रकार बिनबाेभाट सुरु असतात. त्यामुळे पाच फाईल गहाळ झाल्या की त्या ठेकेदार बाहेर घेऊन गेले हाेते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. या सगळ्यावर प्रशासनाकडून कारवाई गेली जाणे अपेक्षित आहे.