केडीएमसीकडे पाणीपुरवठ्याचे ३०७ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:49 PM2019-01-13T23:49:14+5:302019-01-13T23:49:50+5:30

२७ गावांचाही समावेश : कारखान्यांसह सरकारी कार्यालयांवरही मोठ्या प्रमाणात थकबाकी

KDMC gets tired of water supply of 307 crores | केडीएमसीकडे पाणीपुरवठ्याचे ३०७ कोटी थकीत

केडीएमसीकडे पाणीपुरवठ्याचे ३०७ कोटी थकीत

Next

कल्याण : पाणीपुरवठ्याच्या बिलापोटी केडीएमसी आणि २७ गावांकडे एमआयडीसीची तब्बल ३०७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी मागील अनेक वर्षांपासून ही थकबाकी असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. केडीएमसी आणि २७ गावांसह कारखाने आणि अन्य सरकारी कार्यालयांचीही थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. एमआयडीसी परिक्षेत्रात पाणीगळतीचे प्रमाण १७.२२ टक्के असून ही गळती आणि पाणीचोरीला आळा घातल्यास पाणीकपात करण्याची गरजच भासणार नाही, याकडे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी लक्ष वेधले आहे.


नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून पाणीबिलाची बिले डोळे विस्फारणारी समोर आली आहे. या माहितीनुसार, केडीएमसीकडून एमआयडीसीला देय असलेली पाणीबिलाची रककम १५५ कोटी ७२ लाख असून २७ गावांची थकबाकी १५२ कोटी सहा लाख इतकी आहे. पूर्वीची थकबाकी, त्यात परिक्षेत्रातील काही गावठाणांना होणाऱ्या पाच एमएलडी पाणीपुरवठ्याची थकीत रक्कम आणि महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांची थकबाकी अशी एकूण ३०७ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी केडीएमसीकडून एमआयडीसीला येणे आहे. महत्त्वाचे म्हणजे, एमआयडीसी परिक्षेत्रातील सुमारे १०० कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात पाणीबिल थकवले असून ती थकबाकीही कोट्यवधींच्या घरात आहे. प्रदूषणामुळे काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. त्याला कारणीभूत ठरलेल्या ओमकार इंजिनीअर्स कंपनीचाही या थकबाकीदारांमध्ये समावेश आहे.


२१ जानेवारी २०१४ रोजी एमआयडीसी परिक्षेत्रात हिरवा पाऊस पडला होता. यात बेकायदेशीरपणे रंग बनवणाºया ओमकार इंजिनीअर्स या कंपनीला जबाबदार धरण्यात आले होते. या कंपनीला नोटीस बजावून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईदेखील केली होती. यावर्षी या घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या कंपनीकडे एक लाख १३ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्याचबरोबर अन्य सरकारी कार्यालयांकडूनही लाखोंची रक्कम एमआयडीसीला येणे बाकी आहे. दरम्यान, केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थकीत रकमेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर याबाबत बोलणे शक्य होईल, असे सांगितले. परंतु, २७ गावांची थकबाकी ती महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वीची असेल. ही थकबाकी कदाचित एमआयडीसीवर लादली गेली असावी, असेही त्यांनी सांगितले.

नवीन जलवाहिन्यांचे काम सुरू : डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. ते काम १९ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कल्याण रोड व खंबाळपाडा रोडच्या बाजूने जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्याची मुदत जुलै २०२० पर्यंत आहे. फेज-१ मधील कामाची निविदा मंजुरीसाठी सादर करण्यात आली असून हे काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

गळती नसल्याचा दावा
सद्य:स्थितीत एमआयडीसी परिक्षेत्रात सलग ३० तासांची पाणीकपात लागू आहे. त्यामुळे गुरुवार सायंकाळपासून ते शुक्रवारी रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद असतो. दरम्यान, माहितीच्या अधिकारात एमआयडीसी परिक्षेत्रात पाणीगळतीचे प्रमाण १७.२२ टक्केअसल्याचे समोर आले आहे. कमीजास्त होणारा पाण्याचा दाब, यात जलवाहिनीवरील एअरव्हॉल्व्ह तसेच जोडणी नादुरुस्त होऊन गळती होत असल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. गळती होणाºया जलवाहिन्या तत्काळ दुरुस्त केल्या जात असून सद्य:स्थितीत कोणतीही गळती होत नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Web Title: KDMC gets tired of water supply of 307 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.