डोंबिवली पूर्वेतील बोगस बांधकाम प्रकरणातील इमारतीवर केडीएमसीचा हातोडा
By मुरलीधर भवार | Published: February 1, 2024 07:40 PM2024-02-01T19:40:25+5:302024-02-01T19:40:57+5:30
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिकेची बांधकाम परवानगी नसताना बोगस बांधकाम परवागनी घेऊन रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविलेल्या ६५ बेकायदा ...
डोंबिवली- कल्याणडोंबिवली महापालिकेची बांधकाम परवानगी नसताना बोगस बांधकाम परवागनी घेऊन रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविलेल्या ६५ बेकायदा इमारत प्रकरणातील इमारतीवर महापालिकेच्या कारवाई पथकाने आज हातोडा चालविला.
महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे आणि ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत, सोनम देशमुख यांनी ही कारवाई केली. शहराच्या पूर्व भागातील आयरे गावातील सरस्वती शाळेच्या जवळ दिलीप पंढरीनाथ पाटील यांनी तळ अधिक पाच मजली ही बेकायदा इमारत उभारली होती. रेरा प्रकरणातील ही इमारत पाडण्याचे काम १७ जानेवारी रोजी सुरु केले होते. इमारतीच्या ठिकाणी रेल्वे ब्रीज आणि रस्ते अरुंद असल्यामुळे या ठिकाणी मोठी मशीनरी जात नव्हती. या इमारतीचा काही भाग मनुष्यबळाने आणि उर्वरित भाग पोकलेनने तोडण्यास १२ दिवसांचा कालावधी लागला.
बोगस बांधकाम प्रकरणातील ६५ बेकायदा इमारतीचे प्रकरणास वास्तूविशारद संदीप पाटील यांनी वाचा फोडली होती. या प्रकरणी त्यांनी माहिती अधिकारात माहिती उघड केली. त्याचबरोबर चाैकशीची मागणी केली. याशिवाय उच्च न्यायालया याचिका दाखल केली. ही याचिका न्याय प्रविष्ट आहे. सध्या डोंबिवलीतील आठ बेकायदा प्रकरणात कारवाई हाेत नसल्याने हरिश्चंद्र म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने आयुक्तांना २४ जानेवारी राेजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावेळी बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या पूर्वीच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने ६५ बेकायदा प्रकरणांतील इमारतींच्या कारवाईचा उल्लेख केला होता.
६५ पैकी काही बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या तर काही इमारतीत नागरीकांचे वास्तव्य असल्याने त्या पाडण्याचा निर्णय घेतला नव्हता. मात्र यापूर्वी जी काही कारवाई केली गेली. ती केवळ फार्स होती असा आरोप तक्रारदार पाटील यांनी केला होता. त्यामुळे आत्ता पुन्हा बोगस परवानगी प्रकरणातील इमारती पाडण्याची कारवाई महापालिकेकडून सुरु करण्यात आली आहे.