केडीएमसीवर हंडा मोर्चा

By Admin | Published: March 16, 2017 02:48 AM2017-03-16T02:48:01+5:302017-03-16T02:48:01+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांतील बेकायदा बांधकामधारक पाणी पळवत

KDMC Handa Morcha | केडीएमसीवर हंडा मोर्चा

केडीएमसीवर हंडा मोर्चा

googlenewsNext

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांतील बेकायदा बांधकामधारक पाणी पळवत असल्याने ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. या कृत्रिम पाणीटंचाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे महापालिकेविरोधात बुधवारी २७ गावांतील संतप्त नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर भव्य हंडाकळशी मोर्चा काढला.
२७ गावांना पाणीपुरवठा नियमित होत नाही. त्यामुळे येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिसरात बेकायदा बांधकामे जोमात सुरू आहेत. बांधकामधारक पाणी पळवत आहेत. परिणामी, ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पाणीटंचाईप्रश्नी महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भोपर परिसरातील भाजपा नगरसेविका रविना माळी यांनी आठवडाभरापूर्वीच दिला होता. मात्र, महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी त्याची दखल घेतली नाही.
त्यामुळे बुधवारी भोपर परिसरातून काढलेल्या मोर्चात नगरसेविका माळी, भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी, नगरसेविका आशालता बाबर, सुनीता पाटील, प्रेमा म्हात्रे, दमयंती वझे आदी सहभागी झाले होते. मोर्चात जवळपास चार हजारांपेक्षा जास्त ग्रामस्थ मुलांसह सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. हा मोर्चा पोलिसांनी महापालिका मुख्यालयाजवळ रोखून धरला होता. महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याविरोधात मुर्दाबादचे फलक दर्शवण्यात आले. २७ गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, आगरी समाजाच्या नादी लागू नका, अशा इशारा संदीप माळी यांनी दिला.
२७ गावांतील बेकायदा बांधकामांविरोधात तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. उपायुक्त सु.रा. पवार कारवाई करत नाहीत. अतिरिक्त आयुक्त घरत त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप माळी यांनी केला आहे.
मोर्चाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त दीपक पाटील यांची भेट घेत त्यांना एक निवेदन दिले. त्यावर पाटील यांनी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने दोन दिवसांत २७ गावांतील पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. मोर्चात शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मनसेचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले नसले तरी त्यांचा मोर्चाला पाठिंबा होता. (प्रतिनिधी)पारदर्शकता दाखवा... : बेकायदा बांधकामप्रकरणी नंदलाल समिती, नांगनुरे समिती आणि अग्यार समितीने दिलेल्या अहवालांची अंमलबजावणी राज्य सरकारने त्वरित करून पारदर्शक असल्याचे कृतीतून दाखवून द्यावे, असे आवाहन मनसेच्या जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभुदेसाई यांनी केले आहे.

पाणीप्रश्न सोडवू
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. २७ गावांचा पाणीप्रश्न नक्कीच सोडवला जाणार आहे. तेथील ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सांगितले.

Web Title: KDMC Handa Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.