पार्किंगसाठी केडीएमसीकडे ४०० प्लॉट उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:42+5:302021-03-04T05:15:42+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने पार्किंगसाठी आरक्षित असलेले जवळपास ४०० प्लॉट निश्चित केले आहेत. ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने पार्किंगसाठी आरक्षित असलेले जवळपास ४०० प्लॉट निश्चित केले आहेत. त्याची यादी पोलीस प्रशासनाला दिली जाईल. पोलिसांनी त्यापैकी कोणते प्लॉट पार्किंगसाठी योग्य आहेत ते ठरवून त्या ठिकाणी पे ॲण्ड पार्क सुरू करावे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समिती दालनात बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, रेल्वेचे एरिया अधिकारी प्रमोद जाधव, आरटीओ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर सूर्यवंशी यांनी ही माहीत दिली. रेल्वे प्रशासनाकडेही स्टेशन परिसरात काही पार्किंगच्या जागा आहेत. त्याचा वाहनचालक पुरेपूर वापर करतात की नाही, याची पाहणी केली जाणार आहे.
कल्याण स्टेशन परिसराचा विकास स्मार्ट सिटीअंतर्गत केला जाणार आहे. त्यामुळे रेल्वेने ब्रेक्समन चाळीत महापालिकेस पार्किंगकरिता जागा द्यावी, अशी मागणी केली आहे. त्या ठिकाणच्या जुन्या चाळी पाडून त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पार्किंगची व्यवस्था केली जाऊ शकते. त्याचबरोबर कल्याण स्टेशन परिसरातील बस डेपो हा विठ्ठलवाडी येथे स्थलांतरित केल्यास त्या ठिकाणी स्टेशन परिसराच्या विकासाचे काम होऊ शकते. या विषयावरही चर्चा झाली.
स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटवून त्यांना सर्वोदय मॉलच्या नजीक असलेल्या एक एकर जागेत पर्यायी व्यवस्था करता येईल. हा एक एकरचा प्लॉट विकसित करून त्या ठिकाणी फेरीवाल्यांना सर्व सेवासुविधा दिल्या जातील असेही आयुक्तांनी सांगितले.
------------------------
वाचली