केडीएमसीने काटकसर धुडकावली, अर्थसंकल्पात १११ कोटींची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:05 AM2018-03-27T01:05:30+5:302018-03-27T01:05:30+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण देत
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण देत तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांनी विकासकामांना कात्री लावत सादर केलेला एक हजार ६९८ कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी महासभेला सादर करताना स्थायी समितीने १११ कोटींची वाढ सुचवत काटकसर फेटाळून लावली आहे. तसेच युथ पार्क, सायकल ट्रॅक, प्रदूषण मोजणारा फलक लावणे, स्टार्ट अपसाठी प्रशिक्षण अशा तरूणांवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या योजनांवर भर दिला आहे. आजवर उपेक्षित राहिलेल्या डोंबिवलीवर दिलेला भर, स्मार्ट सिटीला गती देण्याची शिफारस यामुळे अर्थसंकल्पावरील भाजपाची छाप स्पष्टपणे समोर आली.
स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी सुधारित एक हजार ८०९ कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना करवसुलीसाठी प्रशासनाचे लक्ष्य वाढवले आहे. मालमत्ता करवसुलीत आधीपेक्षा ३५ कोटी रुपयांची वाढ सुचवत ती ३७५ कोटींवर नेली आहे. एलबीटीच्या भरपाई अनुदान योजनेतून २६३ कोटी १६ लाख अपेक्षित आहेत. पाणीपट्टीच्या ६० कोटी रुपयांच्या वसुलीत दहा कोटीची वाढ सुचवली आहे. विशेष कर वसुलीत २५ कोटींची वाढ सुचवत त्याचे लक्ष्य १५० कोटी १० लाख करण्यात आले आहे. महापालिकेच्या मालमत्तांतून १५ कोटींची वाढ अपेक्षित धरली आहे. इतर सेवा शुल्कातून ६१ कोटी ३२ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
अशा असतील नव्या योजना
शहरात नाना नानी पार्क आहेत. मात्र तरुणांच्या विरंगुळ््यासाठी युथ पार्क उभारण्यासाठी ५० लाखांची तरतूद.
महापालिका हद्दीत व्यवसाय करुन शकणाºया तरुणांना स्टार्ट अप प्रशिक्षण. पालिकेने स्टार्ट अप इन्क्युबेटर केंद्र उभारण्यासाठी १० लाखांची तरतूद आहे.
डोंबिवलीतील प्रदूषणाचे मोजमाप करता यावे यासाठी ‘एअर पोल्यूशन इंडेक्स डिजिटल डिस्प्ले’ उभारण्यासाठी ६० लाखांची तरतूद.
घाणेरड्या डोंबिवलीचा आणि एकंदरीतच अस्वच्छ शहरांचा कलंक पुसून काढण्यासाठी क्लिन
अप मार्शल नेमण्याचा प्रस्ताव.
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील दहा एकर जागेवर सायकल ट्रॅक तयार केला जाईल. तो तीन किलोमीटरचा असेल. त्यासाठी ७५ लाखांची तरतूद.
कल्याण-डोंबिवलीच्या खाडी किनारा विकासासाठी एक कोटींची तरतूद. त्यासाठी ३५ कोटींची आवश्यकता.
डोंबिवलीच्या गणेश घाट विकासासाठी ५० लाखांची तरतूद.
नेतिवली येथील वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तव्य असलेली गुंफा विकसित करणार. डोंबिवलीतील सृतिका गृह पाच वर्षापासून बंद आहे. त्याच्या विकासासाठी २.५ कोटींची तरतूद.
दुर्गाडी किल्ले परिसर सुशोभित करण्यासाठी २५ लाख.
डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी टाटा पॉवर लाईन परिसरात वाहनतळ विकसित करणार.
- जुन्या कल्याण डोंबिवलीत रस्ते रुंदीकरण शक्य नसल्याचे सांगत, इमारती पाडणे व्यावहारिक होणार नसल्याचे सांगत रहिवाशांना दिलासा. या भागात एकेरी वाहतुकीचा पर्याय राबविणार.
जॅमर यंत्रणा बसविण्यासाठी २५ लाखाची तरतूद एक कोटींवर.
पुलांच्या देखभाल-दुरुस्तीवरील ५० लाखांची तरतूद एक कोटी ५० लाख.
डोंबिवलीच्या शिवमंदिर रोडवरील मोक्षधाम स्मशानभूमीचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी
७२ लाख.
कल्याण पश्चिमेतील डोलारे सुतार कबरस्तानासाठी २० लाख.
डोंबिवली मोठागाव-ठाकुर्ली स्मशानासाठी
५० लाख.
पत्रकारांसाठी आपतकालीन निधी म्हणून ५० लाखाची तरतूद. अग्नीशमन वाहन खरेदीची तरतूद ५० लाखांवरून एक कोटीवर.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमंची तरतूद आठ लाखांवरून १५ लाख.
पालिकेच्या बल्याणी शाळेच्या इमारत बांधणीसाठी ७५ लाख.
शाळा दुरुस्ती व निगा राखण्यासाठी २५ लाखांची तरतूद ७१ लाखांवर.
विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषण कौशल्यावरील खर्च २५ लाखांवरून
३५ लाख.
दिव्यांगाच्या शाळेसाठी ५० लाखाची तरतूद.
तारांगण उभारण्याचाही प्रस्ताव.
कूपनलिका देखभाल-दुरुस्तीचा खर्च ७० लाखांवरुन एक कोटी.
सार्वजनिक विहिरी, तलावांची स्वच्छता व दुरुस्तीसाठी ५० लाखांचा निधी ७० लाखांवर. नव्या जलवाहिन्या टाकणे व जलकुंभ उभारणीची तरतूद दोन कोटींवरून सात कोटी.
२७ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची तरतूद ५० लाखांवरून तीन कोटी. या गावांतील १८० कोटींची पाणीपुरवठा योजना दोन वर्षात पूर्ण होण्याचा दावा.
सुरळीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी सात कोटी.
डोंबिवलीतील पाण्याचे झोनिंग करण्यासाठी २५ लाखांची विशेष तरतूद.
सर्व प्रभागात ई टॉयलेट उभारण्यासाठी नऊ कोटी.
सॅनिटरी नॅपकीन मशीनसाठी एक कोटी.
जुन्या बागांच्या देखभाल-दुरुस्तीची तरतूद दुप्पट करुन दोन कोटी.
बारावे व उंबर्डे डम्पिंग ग्राऊंडकडे जाणाºया रस्त्यासाठी एक कोटी.
परिवहन विभागाच्या महसुली खर्चाची तरतूद तीन कोटींवरून १३ कोटी.
भाजपाची साथ, डोंबिवलीचा विकास : सभापती राहुल दामले हे भाजपाचे असल्याने आजवर उपेक्षित राहिलेल्या डोंबिवलीला अधिक योजना, तरतुदी देण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसून येते. स्मार्ट सिटी आणि स्टार्टअप हे भाजपाप्रणित कार्यक्रम राबवण्यासाठी १० लाखांचा निधी ठेवला आहे. आयुक्तांच्या अर्थसंकल्पावर दामले यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच त्यांनी पायाभूत सुविधा आणि तरूण-ज्येष्ठ नागरिकांचा विचार करत त्यात १११ कोटीची वाढ केली आहे.