कोविडवर केडीएमसीचे आतापर्यंत ३५ कोटी खर्च; बिले अदा, अद्याप उभारली जात आहे यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:24 AM2020-08-29T00:24:12+5:302020-08-29T00:24:23+5:30
मनपाच्या लेखा विभागाने कोविडसाठी एक वेगळे खाते उघडले आहे. अन्य उत्पन्नातील पैसाही त्यावरच खर्च केला जात आहे. मनपास राज्य सरकारकडून १७ कोटींचा निधी कोविडसाठी मिळाला होता.
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत ३५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तसेच अद्याप काही यंत्रणा उभारण्यात येत असल्याने आणखी १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मनपा हद्दीत मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. जुलैमध्ये रुग्णसंख्या शिगेला पोहोचली होती. मनपाची अवघी दोनच रुग्णालये व १५ आरोग्य केंद्रे होती. रुग्णालयांत डॉक्टर व नर्सची संख्या अपुरी होती. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी मनपाने जम्बो सेटअप उभारला. सुरुवातीला रुग्णवाहिका, आॅक्सिजन, आयसीयू बेड व व्हेंटिलेटरही मिळत नव्हते. मनपाने प्रथम शास्त्रीनगर रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू केले.
परंतु, तेथे केवळ ६३ बेडच उपलब्ध झाले. त्यानंतर मनपाने क्रीडासंकुलातील बंदिस्त सभागृह, डोंबिवली जिमखाना, पाटीदार भवन, आसरा फाउंडेशनची शाळा येथे कोविड रुग्णालये उभारल्याने ७६२ बेड उपलब्ध झाले आहेत. तर, फडके आर्ट गॅलरी, वसंत व्हॅली, टिटवाळा येथे रुग्णालये उभारण्याचे काम अजून सुरू आहे. तेथील बेड उपलब्ध झाल्यास एकूण एक हजार ३३१ बेड उपलब्ध होतील.
मनपाने दुसरीकडे तीन खाजगी रुग्णालये अधिग्रहीत केली. तेथे सुरुवातीला एक महिन्यापेक्षा जास्त काळ कोविड रुग्णांवर मोफत उपचार केले गेले. त्याचा खर्च मनपाने केला होता. टाटा आमंत्रण येथे दोन ते तीन हजार रुग्णांचा चहा, नाश्ता, दोनवेळच्या जेवणाचा खर्च मनपा करत आहे.
मनपाने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयची भरती केली. रुग्णवाहिका भाड्याने घेतल्या. मनपाने टोकलिझुमॅब, रेमडेसिवीर ही दोन महागडी इंजेक्शन खरेदी करून रुग्णांना उपलब्ध करून दिली आहेत. तसेच वॉररूम व कॉलसेंटर सुरू केले आहे. रुग्णांना आॅक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू मशीन उपलब्ध करून दिले आहे. या सर्व बाबींवर आतापर्यंत ३५ कोटी खर्च झाले असून, त्याची बिले प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांना दिली आहेत. यामुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावर समाधान व्यक्त केले जात आहे.
सरकारकडून मिळाले १७ कोटी
मनपाच्या लेखा विभागाने कोविडसाठी एक वेगळे खाते उघडले आहे. अन्य उत्पन्नातील पैसाही त्यावरच खर्च केला जात आहे. मनपास राज्य सरकारकडून १७ कोटींचा निधी कोविडसाठी मिळाला होता. मात्र, त्यापेक्षा मनपाचा दुप्पट निधी खर्च झाला आहे. सध्या कोविड रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. येत्या २५ दिवसांत ही संख्या कमी होऊ शकते, असा अंदाज असला, तरी रेल्वे सुरू झाल्यास अथवा अनलॉकमध्ये नागरिक जास्त संख्येने बाहेर पडत असल्याने पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. तेव्हा आरोग्य यंत्रणा कमी पडू नये, यासाठी पुरेशी यंत्रणा उभारल्यास ती उपयुक्त ठरू शकते, असा दावा मनपाने केला आहे.