केडीएमसी मुख्यालयावर धडकले फेरीवाले
By admin | Published: October 27, 2016 03:44 AM2016-10-27T03:44:05+5:302016-10-27T03:44:05+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या फेरीवालाविरोधी पथकाने बुधवारी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कारवाईदरम्यान काही मूर्ती आणि साहित्याची मोडतोड झाल्याचा आरोप करत
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या फेरीवालाविरोधी पथकाने बुधवारी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कारवाईदरम्यान काही मूर्ती आणि साहित्याची मोडतोड झाल्याचा आरोप करत संतप्त फेरीवाल्यांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली.
दिवाळीनिमित्त कल्याण-डोंबिवलीत बाजारपेठा गजबजल्या आहेत. रांगोळी, पणत्या, आकाशकंदील, बच्चे कंपनीसाठी मावळे आदी साहित्यांची विक्र ी जोमात सुरू आहे. त्यामुळे शहरात नेहमीपेक्षा जादा फेरीवाले दाखल झाले आहेत. ‘कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांची दिवाळी’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये बुधवारी महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना धारेवर धरत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अरु ण वानखेडे यांनी आचार्य अत्रे रंगमंदिर, घेलाजीदेवी चौक, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक आदी परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे फेरीवाले आणि फेरीवालाविरोधी पथकांमध्ये वादाचा भडका उडला.
दरम्यान, या कारवाईत साहित्य गाडीत टाकताना काही मूर्ती व साहित्याची फेरीवालाविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी मोडतोड केली, असा आरोप करत संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. त्यांनी कारवाईचा निषेध नोंदवून आयुक्त ई. रवींद्रन यांना भेटण्याची मागणी लावून धरली. सुरक्षारक्षकांनी त्यांना मुख्यालयाच्या दरवाजात रोखले. महापालिका उपायुक्त दीपक पाटील यांनी फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत दिवाळीदरम्यान कारवाई शिथिल करण्याचे आदेश संबंधितांना दिले. त्यानंतर, फेरीवाले माघारी परतले. (प्रतिनिधी)